Diwali Panati : दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन
‘अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’ ! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली. लंकापती रावणावर विजय मिळवून प्रभु श्रीराम अयोध्येस परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत दीपोत्सव करून केले. सध्याच्या रज-तमप्रधान काळात मेणाच्या पणत्यांची पेठेत (बाजारात) रेलचेल दिसून येते. तसेच मेणाच्या पणत्या लावण्याची मानसिकताही आढळते. जुनीजाणती मंडळी मात्र तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून मातीच्या पारंपरिक पणत्या लावतात. तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेल्या मातीच्या पणत्यांचे सात्त्विकतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. हे महत्त्व समाजाला समजण्यासाठी मेणाची पणती आणि तिळाचे तेल अन् कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आला. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.
१. मेणाच्या आणि मातीच्या पणत्यांची केलेली निरीक्षणे
या प्रयोगात दोन्ही पणत्या पेटवण्यापूर्वी अन् पेटवल्यानंतर, तसेच त्यांचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्या विझल्यानंतर लगेच आणि १० मिनिटांनी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
२. चाचणीचे निष्कर्ष
२ अ. मेणाच्या पणतीतून वातावरणात नकारात्मक स्पंदने, तर मातीच्या पणतीतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : मेणाच्या पणतीमध्ये मूलत: नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली. ही पणती पेटवल्यानंतर अन् विझल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ उत्तरोत्तर वाढत गेली. याउलट तिळाचे तेल अन् कापसाची वात असलेल्या मातीच्या पणतीमध्ये मूलत: सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली आणि ही पणती पेटवल्यानंतर अन् विझल्यानंतरही तिच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ उत्तरोत्तर वाढत गेली.
२ आ. दोन्ही पणत्यांतून प्रक्षेपित झालेल्या स्पंदनांचा परिणाम त्या विझल्यानंतरही वातावरणात टिकून रहाणे : मेणाची पणती विझल्यानंतर १० मिनिटांनी देखील तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. मातीची पणती विझल्यानंतर १० मिनिटांनीदेखील तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. यातून हे लक्षात येते की, जर आपण घरामध्ये मातीची पणती पेटवली, तर पणती विझल्यानंतरही तिच्यातील सकारात्मक स्पंदने घरामध्ये टिकून रहातात.
२ इ. मेणाच्या पणतीचा वापर टाळून पारंपरिक मातीच्या पणतीचा वापर करणे श्रेयस्कर ! : मेणाची पणती विझल्यानंतर १० मिनिटांनी केलेल्या चाचणीतून तिच्यामध्ये असणार्या नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ती पेटवल्यानंतरच्या प्रमाणापेक्षाही अधिक आहे. यातून हे लक्षात येते की, मेणाच्या पणतीमधील नकारात्मक स्पंदने अल्प होण्यास (मूळ स्थितीला येण्यास) वेळ लागतो. मातीची पणती विझल्यानंतर १० मिनिटांनी केलेल्या चाचणीतून तिच्यातील सकारात्मक स्पंदने वातावरणात टिकून होती. त्यामुळे मेणाच्या पणतीचा वापर टाळून पारंपारिक मातीच्या पणतीचा वापर करणे श्रेयस्कर आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. मेणाच्या पणतीमधील मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे त्यामधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट मातीच्या पणतीमधील नैसर्गिक सत्त्वगुणी घटकांमुळे त्यामधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात. सात्त्विक घटकांमुळे मातीच्या पणतीमध्ये सात्त्विक (सकारात्मक) स्पंदने आढळली. याउलट मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे मेणाच्या पणतीमध्ये असात्त्विक (नकारात्मक) स्पंदने आढळली. सत्त्वगुणी घटकांमुळे वातावरण सकारात्मक बनते, तर तमोगुणी घटकांमुळे वातावरणात त्रासदायक स्पंदने पसरतात. यावरून लक्षात येते की, ‘तिळाचे तेल आणि हाताने वळलेली कापसाची वात घालून मातीच्या पणत्या लावणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.८.२०२३) ॐ
ई-मेल : mav.research2014@gmail.com
वाचकांना आवाहन !
दिवाळीत मेणाच्या पणतीचा वापर टाळून पारंपरिक मातीच्या पणतीचा वापर करा !दिवाळी हा तेजाची उधळण करणारा सण आहे. दिवाळी हा सण ४ दिवसांपेक्षा अधिक काळाचा असल्याने आपण जितके दिवस ज्या प्रकारच्या पणत्या घरामध्ये प्रज्वलित करू, त्या प्रकारची स्पंदने संपूर्ण घरामध्ये प्रक्षेपित होणार. मेणाची पणती दिसण्यास आकर्षक असली, तरी तिच्यामध्ये मूलत: नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली. दिवाळीच्या काळात घरामध्ये मेणाच्या पणत्या पेटवल्याने पूर्ण घरामध्ये त्यातील नकारात्मक स्पंदने पसरणार आणि पणती विझल्यानंतरही तिच्यातील नकारात्मक स्पंदने घराच्या वातावरणात पसरत रहाणार. त्यामुळे दिवाळीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मकतेचे तेज पसरवण्यासाठी मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !’ – श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.८.२०२३) ॐ |