पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

  • सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल

  • पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली गोव्यातील मंदिरे !

पणजी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) : पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती गोवा सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिली आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव समितीने सरकारसमोर ठेवला आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या एका समितीची स्थापना केली आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘सरकारने स्थापन केलेल्या समितीने त्यांचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द केला आहे. समितीला अशा स्वरूपाची १ सहस्रांहून अधिक मंदिरे आणि वास्तू सापडल्या आहेत. या समितीने नार्वे, डिचोली येथील ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे.’’