मी माझ्या वेतनावर समाधानी आहे !

गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दालनासमोर लावलेल्या अभिनव फलकाची सातारा शहरात चर्चा !

गटविकास अधिकारी सतीश बुद्धे

सातारा, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – शासकीय अधिकारी म्हटले की, कामे करवून घेण्यासाठी त्यांच्या मागेपुढे करण्यासोबतच त्यांना विविध प्रलोभने दाखवली जातात. ही गोष्ट लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातून सातारा येथे स्थानांतरीत झालेले गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी स्वत:च्या दालनाबाहेर फलक लावला आहे. या फलकावर त्यांनी ‘मी माझ्या वेतनावर समाधानी आहे !’ या आशयाचा फलकच लावला आहे. सध्या बुद्धे यांनी दालनाबाहेर लावलेल्या या फलकाची चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे.

सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून बुद्धे यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी पदभार स्वीकारला आहे. काही दिवसांत आलेले अनुभव लक्षात घेऊन त्यांनी दालनाबाहेर वरील आशयाचा फलक लावला. बुद्धे यांनी दालनाबाहेर लावलेल्या फलकामुळे पैसे घेऊन नागरिकांची शासकीय कामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

असे आहे लिखाण !

मी दौर्‍यावर असतांना भेटू शकलो नाही, तर मला खाली दिलेल्या भ्रमणभाष क्रमांकावर निवेदन, लेखी स्वरूपातील तक्रारी (संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या अभिप्रायानंतर व्हॉट्सॲप संदेश नाव आणि गावाच्या उल्लेखासह) कराव्यात. भ्रमणभाष क्रमांक : ९१३०२ १४९८६

सातारा पंचायत समिती कार्यालयात माझ्या नावाखाली कोणताही अपप्रकार होऊ नये, यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून सेवा करतांना शासनाकडून मिळणारे वेतन पुरेसे आहे. अधिकची माया जमवण्याची माझी इच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची आवश्यकता नाही. जे योग्य काम आहे, ते मार्गी लागणारच, याची निश्चिती सातारावासियांनी बाळगावी.

– सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, सातारा

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अशा स्वरूपाचा फलक लावणारे बुद्धे यांचे अभिनंदन ! सर्वच शासकीय अधिकार्‍यांनी त्यांचा आदर्श ठेवल्यास भ्रष्टाचाराला पायबंद बसू शकेल, हे निश्चित !