रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रात झालेल्या श्री वाराहीदेवीच्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. ‘यागाचा लाभ सर्वत्रच्या साधकांना व्हावा’, असे वाटणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे
‘नवरात्रातील ७ व्या दिवशी, म्हणजे २.१०.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री वाराहीदेवीचा याग झाला. यागाच्या आदल्या दिवशी ‘या यागाचा सर्वत्रच्या साधकांना लाभ व्हायला हवा’, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षात यागाच्या दिवशी हा याग सगळ्यांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे दाखवण्यात येणार असल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.
२. श्री वाराहीदेवीचा मंत्र वैखरी वाणीतून म्हणतांना आलेल्या अनुभूती
यागाच्या दिवशी पुरोहितांनी सर्व साधकांना श्री वाराहीदेवीचा मंत्र १०८ वेळा वैखरी वाणीतून म्हणावयास सांगितला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
अ. मंत्र म्हणत असतांना माझे मन एकाग्र आणि निर्विचार झाले होते.
आ. ‘मी एका खोल आणि विशाल असलेल्या पोकळीत जात आहे. तेथे केवळ देव, भक्त आणि साधक आहेत. त्यानंतर देव आणि मी एवढेच आहोत’, असे मला वाटत होते. मला या पोकळीत गेल्यावर शंखामधून आवाज येतो, त्याप्रमाणे वार्याचा आवाज येत होता आणि त्यातून ‘ॐ’ असा ध्वनी येऊन तो पोकळीत घुमत होता.
इ. मध्येच माझे मन एकाग्र होऊन मला श्री वाराहीदेवीचे रूप समोर दिसायचे, तर काही वेळा दोन्ही सद्गुरु (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) समोर दिसायच्या.
ई. ‘वराह रूपातील श्रीविष्णूने जशी पृथ्वी पाताळातून वरती आणली, त्याप्रमाणेच वाराहीदेवी हिंदु राष्ट्र आणणार आणि संत अन् साधक यांचे रक्षण करून त्यांना सर्व संकटांपासून मुक्त करणार’, असे मला जाणवले.
उ. श्री वाराहीदेवीकडे पहातांना मला ‘देवीचे रूप निर्मळ आणि वात्सल्यमय आहे’, असे जाणवले.
ऊ. मधूनच मला श्री वाराहीदेवीचे मारक रूप जाणवायचे. आम्ही मंत्र म्हणत असतांना मला तिची मारक शक्ती जाणवत होती.
ए. ‘देवी सद्गुरु, संत, पुरोहित आणि सर्व साधक म्हणत असलेला मंत्रजप ऐकत आहे’, असे मला जाणवले.
ऐ. एका बाजूस देवी सूक्ष्मातून युद्ध करत होती, तर दुसर्या बाजूस भक्तांची हाक ऐकत होती.
ओ. काही वेळाने मला समोर श्री वाराहीदेवी न दिसता तिच्या जागी दोन्ही सद्गुरुच (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ याच) दिसू लागल्या.
माझा १०८ वेळा मंत्रजप कधी पूर्ण झाला, हे मला कळलेच नाही.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |