रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञांच्या वेळी मंत्रपठण करतांना सनातन पाठशाळेतील पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांना आलेल्या अनुभूती
१. बगलामुखी यागाच्या वेळी ब्रह्मास्त्र मंत्र म्हणत असतांना तो मारक भावात म्हटला जाणे आणि पूर्ण आवेषात येऊन मंत्रपठण होणे अन् यागानंतर मारकता न्यून होऊन शांत वाटणे
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने ‘बगलामुखी याग’ करण्यात आला. या वेळी आम्हाला सप्तर्षींनी ‘बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र’ म्हणायला सांगितला होता. तसेच पू. नीलेश सिंगबाळ (आताचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ) आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना यज्ञामध्ये आहुती देण्यास सांगितले होते. आम्ही बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र म्हणायला लागलो. हा मंत्र म्हणत असतांना माझ्याकडून तो आपोआपच मारक भावात म्हटला जात होता. काही वेळाने मंत्र म्हणतांना स्वतःतील मारकभाव वाढल्यामुळे माझ्याकडून पूर्ण आवेषात येऊन मंत्रपठण होऊ लागले. त्या वेळी मला आजूबाजूचे काहीच भान नव्हते. केवळ मी आणि मंत्र एवढेच माझे विश्व बनले होते. यागानंतर माझ्यातील मारकता न्यून होऊन मला शांत वाटत होते.
२. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रत्यंगिरादेवी आणि राजमातंगीदेवी यांच्या यागांच्या वेळीही मंत्रपठण मारकभावात होणे
त्याचप्रमाणे सप्तर्षींच्या आज्ञेने पुढील ५ – ५ दिवस अनुक्रमे ‘प्रत्यंगिरादेवी’ आणि ‘राजमातंगीदेवी’ यांचे याग झाले. या यज्ञांच्या वेळीही दोन संत आहुती देत होते. या यागांच्या कालावधीत मंत्रपठण करत असतांना मला प्रतिदिन वरीलप्रमाणे अनुभूती येत होती.
३. श्रीराम यागाच्या वेळी मंत्रपठण करत असतांना आरंभीपासूनच पुष्कळ भावजागृती होत असल्याचे जाणवणे
त्यानंतर सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीराम याग करण्यात आला. या वेळीही वरीलप्रमाणेच संत यज्ञात आहुती देत होते. या यागाच्या वेळी मंत्रपठण करत असतांना आरंभीपासून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. मंत्र म्हणतांना भावजागृती होत असल्यामुळे माझा आवाज काही वेळा न्यून होत होता. एरव्ही भावजागृती होण्यासाठी काहीतरी प्रसंग घडलेले असतात किंवा मनात पुष्कळ कृतज्ञता वाटत असते. या यज्ञाच्या वेळी मंत्रपठण करतांना तसे काहीच घडले नव्हते, तरी माझी भावजागृती होत होती. ‘काही कारण नसतांना आपोआप भावजागृती होत आहे’, याचे मला आश्चर्य वाटले.
४. पुरोहित साधकाच्या मुखातून साक्षात् महर्षि, वेदपुरुष आणि सरस्वतीदेवी हेच मंत्रपठण करत असल्याची पदोपदी जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे
वरील अनुभूतींमधून मला शिकायला मिळाले, ‘यज्ञानुसार आवश्यकतेप्रमाणे मंत्रपठण करत असतांना देवच आपल्यामध्ये मारक आणि तारक भाव निर्माण करत असतो. पुरोहित साधकाच्या मुखातून त्या वेळी साक्षात् महर्षि, वेदपुरुष, सरस्वतीदेवी हेच मंत्रपठण करत असतात’, याची पदोपदी मला जाणीव होते. ‘अखिल मानवजातीसाठी करण्यात येणार्या यज्ञांमध्ये मला मंत्रपठण करण्याची संधी मिळत आहे’, त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |