श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना न ओळखणार्या लोकांनीही ओळखली त्यांची दैवी शक्ती आणि साधकाने अनुभवली त्या लोकांची श्रद्धा अन् भाव !
२३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/731008.html
५. आंध्रप्रदेशातील अंतरवेदी या गावी नरसिंह स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती
५ अ. गावात पोचण्यासाठी विलंब होत असतांना स्थानिक लोकांनी सतत विचारपूस करून ‘घेण्यासाठी येतो’, असे सांगणे, त्यांना नको सांगूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या भेटीची ओढ लागल्याने ते गावाच्या बाहेर २ कि.मी. अंतरावर येऊन थांबणे : ‘आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी अंतरवेदी (आंध्रप्रदेश) या गावाला जाण्यासाठी निघालो. त्या गावातील स्थानिक लोकांना आमची पोचण्याची वेळ कळवली होती. मार्ग चांगला नसल्याने आम्हाला पोचायला उशीर होत होता. आम्ही वेळेवर पोचत नाही, हे त्यांना कळल्यावर ते प्रत्येक ५ मिनिटांनी आमची विचारपूस करत होते. त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्ही जेथे असाल, तेथे आम्ही घेण्यासाठी येतो.’’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या, ‘‘त्यांना उगीच त्रास नको. आपण तिकडे येऊ’, असे त्यांना सांगा.’’ तरीही ते आम्हाला घेण्यासाठी गावाच्या बाहेर २ कि.मी. अंतरावर येऊन थांबले होते. भेट झाल्यावर ते आम्हाला आनंदाने म्हणाले, ‘‘आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या भेटीची ओढ लागली होती; म्हणून आम्ही इकडे येऊन थांबलो.’’ हे सांगतांनाही त्यांना पुष्कळ आनंद झाला होता.
५ आ. अंतरवेदी येथील स्थानिक लोकांनी तिखट ताक देऊनही त्यांच्यातील आंतरिक भावामुळे ते सहजतेने ग्रहण करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! : त्यानंतर स्थानिक लोक आम्हाला वाटेतच ताक पिण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘दर्शन घेऊन झाल्यावर आपण ताक पिऊ.’’ दर्शन झाल्यावर त्यांनी आम्हाला ताक दिले. ताक फार तिखट होते. आम्हाला ताक पितांना पुष्कळ त्रास होत होता. आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘ताक तिखट आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो’, याविषयी खुणेने सुचवले, तरीही त्या आनंदाने ताक प्यायल्या. त्यानंतर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘त्यांनी आपल्यासाठी पुष्कळ भावपूर्ण ताक बनवले होते. त्यामुळे ताक पितांना मला काही वाटले नाही.’’ एरव्ही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना तिखट पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो; पण त्या दिवशी त्यांना त्याचा काहीही त्रास झाला नाही. तेव्हा मला श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ल्याचा प्रसंग आठवला.
५ इ. ‘‘तुम्ही आमच्या शेतात केवळ पाऊल ठेवा. आमचे सर्व छान होईल’’, असे गावातील लोकांनी सांगणे आणि ‘साक्षात् देवी घरी आली आहे’, असा भाव ठेवून आदरातिथ्य करणे : त्या गावातील लोकांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी पुष्कळ भाव आणि श्रद्धा वाटत होती. खरं तर ते आम्हाला प्रथमच पहात होते. त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना प्रार्थना केली, ‘‘तुम्ही आमच्या शेतात केवळ पाऊल ठेवा. आमचे सर्व छान होईल.’’ त्यांच्या बोलण्यात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी एवढा भाव होता की, ‘ते किती तरी वर्षांपासूनचे साधक आहेत’, असे मला वाटत होते. शेवटी ते आम्हाला त्यांच्या घरी जेवायला घेऊन गेले. ‘साक्षात् देवी घरी आली आहे’, असा भाव ठेवून त्यांनी आदरातिथ्य केले. शेवटी ते म्हणाले, ‘‘तुम्ही या भागात येणार असल्यास आणि काही साहाय्य लागल्यास आम्हाला कळवा. आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू.’’
हे सर्व पाहून मला वाटले, ‘साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चैतन्याचा हा सर्व परिणाम आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हे सर्व एकाच वेळी एवढे सर्व करणे शक्य नाही. एका भेटीत अशी जवळीकता केवळ देवच करू शकतो.’
५ ई. अवताराने स्वतःचे अवतारत्व कधीही न सांगणे आणि ते पंचमहाभूतांच्या माध्यमातून अन् प्रत्यक्ष कृतीमधून त्यांनी ते दाखवणे : अवतार स्वतः कधीही सांगत नाहीत की, मी अवतार आहे. याविषयी ते पंचमहाभूतांच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून देत असतात. हे मला पहायला आणि शिकायला मिळाले. दैवी कृती पहात असतांना पंचमहाभूतांनी दाखवून दिले की, तुम्ही ज्यांच्या समवेत आहात, ते साक्षात् श्रीविष्णु आणि महालक्ष्मी यांचे अवतार आहेत. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), आम्हाला हे सर्व तुमच्या कृपेमुळे पहायला आणि अनुभवण्यास मिळाले.
गुरुदेव, ‘आम्ही साक्षात् अवताराच्या समवेत आहोत’, याची आम्हाला सतत जाणीव नसते. त्यात आम्ही पुष्कळ अल्प पडतो. ‘आम्हाला त्याची जाणीव प्रत्येक क्षणाला होऊन तुमची सेवा करता येऊ दे’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना.’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (३०.६.२०२३) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |