बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

प.पू. कलावतीआई

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

‘मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो, तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत रहावे लागते. काम, क्रोध, द्वेष, मत्सर, हे सर्व अहंकाराच्या नियंत्रणात असतात. गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना केली असता अहंकाराची शक्ती क्षीण होत जाते आणि प्रेमाचा दिवा लागतो.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव

(साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘मार्गदर्शन’, सुवचन क्र. २८)

पू. किरण फाटक

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

२ अ. माणसाला प्रारब्धामुळे विशिष्ट भोग भोगण्यासाठी शरीर प्राप्त होत असणे : ‘जन्म झाल्यानंतर काही वर्षांतच माणसाला ‘आपण जगापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत’, हे कळायला लागते. हळूहळू त्याच्यामध्ये अहंकाराचा शिरकाव होतो. अहंकार म्हणजेच ‘मीपणा.’ माणूस ‘आपला देह म्हणजेच आपण आहोत’, असे मानत असतो; परंतु माणूस हा शरिरापेक्षा वेगळा असतो. माणसाचा आत्मा किंवा माणसात असलेले चैतन्य हे सर्व जगातील चैतन्याचा एक भाग असतो. हे चैतन्य चराचरात भरलेले असते. त्याचाच एक भाग म्हणजे आत्मा. तो माणसाच्या शरिरात वास करत असतो. माणसाला प्रारब्धामुळे शरीर प्राप्त होते. त्याला विशिष्ट भोग भोगण्यासाठी कालचक्रातून या शरिराची प्राप्ती झालेली असते.

२ आ. मनुष्य ‘माझेपणा’चे ओझे डोक्यावर बाळगत असणे, त्याला ते ओझे गोड वाटू लागणे आणि मिळालेल्या सर्व गोष्टींचा कर्तेपणा त्याने स्वतःकडे घेणे : माणसाला कळू लागल्यावर हळूहळू तो अनेक वस्तू जोडू लागतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणि दागिने वापरतो अन् ‘हे माझे, ते माझे’, असे म्हणत रहातो. यामागे अहंकार दडलेला असतो. हा अहंकार केवळ कपडे आणि दागिने यांपुरता मर्यादित रहात नाही, तर हा अहंकार माणसांनाही लपेटून टाकतो, म्हणजे ‘हा माझा मुलगा, तो माझा मित्र, हे माझे वडील, ती माझी आई’, असे हे ‘माझेपणा’चे ओझे माणूस नेहमी डोक्यावर बाळगत असतो आणि अहंकाराचे हे ओझे त्याला गोड वाटते.

‘माझ्याकडे भरपूर पैसा, बंगला, सुंदर पत्नी आणि छान छान मुले आहेत. ती हुशार आहेत’, या सगळ्यांचे श्रेय तो स्वतःकडे घेत असतो. ‘हे सगळे माझ्यामुळे झाले’, असे तो सारखे म्हणत असतो; परंतु तो कधी स्वतःकडे, म्हणजे स्वतःच्या अंतरात डोकावून बघत नाही. ‘मी कोण आहे ? कशासाठी जन्माला आलो ? माझे कार्य काय आहे ?’, याकडे त्याचे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागते. यालाच ‘संसारात रममाण होणे’, असे म्हणतात.

२ इ. देवाने मनुष्याला जन्मतःच दिलेले गुण इतरांच्या भल्यासाठी वापरले न गेल्याने कालांतराने ते नाहीसे होऊन हळूहळू त्याचा अहंकार वाढीस लागणे : देव जन्मतःच माणसाला काही विशिष्ट गुण देत असतो. ‘हे गुण तो माणूस आणि समाज यांच्या भल्यासाठी वापरले जावेत’, अशी त्या दैवी शक्तीची इच्छा असते; परंतु हे गुण माणूस ओळखत नाही किंवा ‘तुझ्यात हे गुण आहेत’, असे सांगणारे त्याला कुणीच भेटत नाही. त्यामुळे माणसातले हे जन्मजात गुण हळूहळू नाहीसे होत जातात आणि त्या गुणांची जागा ‘अहंकार’ घेतो. मनुष्याच्या त्या गुणांचे कौतुक झाले आणि त्यातून त्याला लोकप्रियता अन् पैसा मिळू लागला, तर त्याचा अहंकार फारच वाढतो. ‘हे गुण मी मिळवले का ? हे गुण माझ्यात कुणी निर्माण केले ?’, असा विचार तो कधीच करत नाही. त्यामुळे त्याच्यातील अहंकार वाढत जातो.

२ ई. अहंकारातून षड्विकार निर्माण होऊन त्यामुळे माणसाचा अहंकार सुखावत असणे; परंतु हे सुख तात्पुरते असून ते दुःखात परिवर्तित होत असणे : हळूहळू माणसाची वागणूकसुद्धा पालटते. तो पावलोपावली दुसर्‍यांचा अपमान करू लागतो, दुसर्‍यांना लागेल असे बोलतो. दुसर्‍यांसमोर आपल्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करतो. दुसर्‍यांची मने दुखावतो, स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी अन्य लोकांची निंदा करतो आणि स्वतःला सिद्ध न करता स्वतः लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच ‘वाईट वागणूक’, असे म्हणतात. अहंकार म्हणजे ‘मीपणा.’ यातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे सहा विकार निर्माण होत असतात अन् ते माणसाला जन्मभर त्रास देतात. ते माणसाचा अहंकार सुखावतात; परंतु हे सुख तात्पुरते असते आणि ‘हे सुख-दुःखामध्ये कधी परिवर्तित होते ?’, हेही माणसाला कळत नाही.

२ उ. माणूस बाह्य प्रलोभनांत लपेटला गेला असल्याने तो ‘स्वतःचे सुख आणि आनंद कशात आहे ?’, हे विसरलेला असणे : आज समाजाची मनःशांती न्यून होत चालली आहे. माणूस पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता यांच्या मागे लागला आहे. माणसाला कौटुंबिक प्रेम मिळेनासे झाले आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांना आजी-आजोबा मिळत नाहीत आणि आजी-आजोबांना वृद्धाश्रम आपलेसे वाटत आहेत; कारण माणूस बाह्य प्रलोभनांत, उदा. भ्रमणभाष, दूरचित्रवाणी संच यांत लपेटला जात आहे. माणूस ‘स्वतःचे सुख आणि आनंद कशात आहे ?’, हे विसरत चालला आहे.

२ ऊ. खरा आनंद मिळण्यासाठी गुरूंच्या उपदेशाचे महत्त्व !

२ ऊ १. गुरूंच्या उपदेशामुळे आणि त्यांनी सांगितलेली साधना केल्याने मनुष्यात सात्त्विक गुण येऊ लागणे आणि त्याला मनःशांती अनुभवता येणे : सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनासारखे होणे, म्हणजे सुख आणि मनाविरुद्ध होणे म्हणजे दुःख. जर माणूस सुख आणि दुःख यांमध्ये सम राहिला, तर त्याला जो आनंद मिळतो, तो खरा आनंद असतो. हा आनंद केवळ गुरु-उपदेशाने आणि गुरूंनी दिलेले साधन केल्यामुळे मिळत असतो. यामध्ये जप-जाप्य येते, नामस्मरण येते आणि आपले वागणेही येते. ‘दुसर्‍याला आनंद देणे, दुसर्‍याचे दुःख आपले मानणे, दुसर्‍याची मनापासून सेवा करणे’, हे सर्व सात्त्विक गुण गुरूंच्या उपदेशाने अंगी येऊ लागतात आणि तो माणूस हळूहळू मनःशांती अनुभवू लागतो.

आजही कुणी आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला, कुणी समाजसेवेला, कुणी शिक्षणाला, तर कुणी कलेच्या सेवेला अर्पण केलेले आपल्याला दिसून येते. या लोकांमुळेच आज समाजात माणुसकी जिवंत आहे आणि अनेकांना सुख अन् आनंद यांचा प्रत्यय येत आहे.

आज माणूस भ्रष्ट झाला आहे. तो स्वार्थाने बरबटला आहे, भरकटला आहे. त्याला ‘सुख आणि आनंद कुठे आहे ? तो कसा घ्यावा ?’, हे कळेनासे झाले आहे. हे थांबवायचे असेल, तर माणसाने गुरु-उपदेश घेतलाच पाहिजे. त्याने समाजातील लोकांचे सद्गुण टिपून घेतले पाहिजेत आणि दुर्गुण सोडून दिले पाहिजेत, तसेच समाजातील सर्वांना आदराने वागवले पाहिजे अन् सर्वांना प्रेम दिले पाहिजे.

२ ऊ २. गुरूंच्या उपदेशानुसार अनेक वर्षे साधना केल्यानंतर माणूस समाधी अवस्थेत, म्हणजे स्वानंदात रमून जात असणे : सद्गुरु आपल्या केवळ कृपादृष्टीने माणसांमध्ये पालट घडवून आणू शकतात. सद्गुरु ‘चांगली साधना कशी करावी ?’, याचे ज्ञान देतात; म्हणून माणूस साधना करता करता समाधी अवस्थेत, म्हणजे स्वानंदात रमून जातो. ही स्थिती अनेक वर्षे साधना केल्यानंतर माणसाला प्राप्त होत असते; म्हणून ‘गुरु-उपदेशाचे स्मरण, चिंतन आणि प्रत्यक्ष साधना करत रहाणे’, हे प्रत्येक शिष्याचे कर्तव्य आहे.’

आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संतांनी ‘लोकांचे कल्याण, उन्नती आणि मानसिक शांती’, यांसाठी अथक परिश्रम केले. त्यांनी लोकांना ईश्वराच्या भजनी लावले. ‘ईश्वराच्या उपासनेने अहंकाराची शक्ती हळूहळू क्षीण होत जाते’, असे प.पू. कलावतीआई आपल्या ‘बोधामृत’ या पुस्तकात म्हणतात.’

– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१९.८.२०२३)