लोकसभेत इंडिया आघाडीच्या दहा तोंडी रावणाचे दहन करू ! – एकनाथ शिंदे
आझाद मैदानावरील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. वर्ष २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा आम्ही निवडून देऊ. लोकसभेत इंडिया आघाडीच्या दहा तोंडी रावणाचे दहन करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात व्यक्त केला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने मेळाव्याची सांगता झाली.
या मेळाव्यामध्ये रामदास कदम, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आदींनी भाषणे केली. मेळाव्यासाठी आझाद मैदानावर राज्यभरातील सहस्रावधी शिवसैनिक एकवटले. व्यासपिठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या वेळी शिवसैनिकांना तलवार देऊन एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. ‘मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्रातच राहील. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे लंडनहून आणण्याचा करार आम्ही केला आहे. त्या वाघनखांवर हे संशय घेत आहेत. शिवरायांचा आदर्श सोडून यांनी अफझलखानाचा आदर्श घेतला आहे. सरकार आल्यावर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असा आरोप या वेळी एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे २ माणसे पाठवली होती. वर्ष २००४ पासूनच शरद पवार यांच्यासमवेत उद्धव ठाकरे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. राज ठाकरे यांची स्तुती केली; म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांचे पंख छाटण्यात आले, असे आरोप या वेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही !
सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी गळा घोटलेले शिवसैनिकांना चालेल का ? हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क गमावला. ज्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला, त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत. आम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापुढे एकनाथ शिंदे यांनी घेतली मराठा आरक्षण देण्याची शपथ !
मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्याची जाणीव आहे. मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयामध्ये आमची भूमिका समजून घेतल्याविना निर्णय घेऊ नये, यासाठी याचिका केली आहे. कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा आरक्षणासाठी आम्ही लढणार आहोत, असे मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषण मध्येच थांबवून व्यासपिठावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापुढे जाऊन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली.