लांजा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सामूहिक शस्त्रपूजन
लांजा – विजयादशमी अर्थात् दसर्यानिमित्त येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीराममंदिर येथे सकाळी ७ वाजता सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले. श्री दुर्गामाता दौड श्रीराममंदिरात आरती करण्यासाठी आली, त्याच वेळी सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
प्रारंभी श्रीराममंदिराचे पुजारी श्री. आप्पा उकली यांनी शस्त्रांचे विधीवत मंत्रोच्चारासहीत पूजन केले. डॉ. समीर घोरपडे यांनी शस्त्रपूजनाची प्रस्तावना केली.
यानंतर चि. यज्ञेश परशुराम गुंजीकर याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अफझलखान वधावर पोवाडा खड्या आवाजात सादर केला.
या वेळी अधिवक्ता रूपेश गांगण म्हणाले, ‘‘विजयादशमी म्हणजेच अधर्मावर विजय मिळवल्याचा दिवस होय. श्री दुर्गादेवीने महिषासुराबरोबर ९ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी म्हणजेच दसर्याला विजय मिळवला. सध्या आपल्या हिंदु धर्मावर, देशावर धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि गोहत्या या माध्यमातून राक्षसी आक्रमणे केली जात आहे. यासाठी शस्त्र आणि शास्त्र आपल्याला जाणून घ्यावे लागेल.’’
यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी २५० लांजावासीय उपस्थित होते.