मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीचा सोहळ्यात वक्तव्य
नागपूर – मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे. दशकभर शांत असलेल्या मणीपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला ? हिंसाचार करणार्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का ?, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केला. संघाच्या येथे झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले…
१. देशात स्वार्थासाठी तसेच राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी राजकीय पक्ष राष्ट्रविघातक शक्तींसमवेत संगनमत करत आहेत. असे करणे हा अविवेक आहे.
२. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. तेथे सर्वांना येणे शक्य नाही; म्हणून प्रत्येक भारतियाने आपापल्या गावातच वेगवेगळ्या मंदिरात कार्यक्रम आयोजित करावेत.
३. काही विनाशकारी शक्ती स्वत:ला ‘सांस्कृतिक मार्क्सवादी’ म्हणतात. त्यांचा जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांस विरोध आहे. काही मूठभर लोकांचा संपूर्ण मानवजातीवर प्रभाव असावा; म्हणून ते अराजकतेचा पुरस्कार आणि प्रचार-प्रसार करत आहेत.
गायक शंकर महादेवन् यांनी सरस्वती श्लोकाने भाषणाला प्रारंभ केला. ‘अखंड भारताचा विचार, परंपरा, संस्कृती वाचवण्यात संघाचे मोठे योगदान आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.