श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !
‘आपण आज वर्ष २०२३ मधील विजयादशमी साजरी करत आहोत. विजयादशमी म्हटल्यावर श्रीरामाची आठवण येते. श्रीरामाने रावणाचा संहार केला तो दिवस, म्हणजे ‘विजयादशमी’ होय !
श्रीरामाच्या हनुमंत, सुग्रीव, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, बिभीषण, जांबुवंत, केवट, सुमंत्र, शबरी आदी अनेक भक्तांचा उल्लेख आपण रामायणात ऐकतो. श्रीरामावतारात घडलेला एक अमूल्य प्रसंग जो शिवाने पार्वतीला सांगितला आणि कलियुगात गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिला आहे, तो आज आपण जाणून घेऊया.
संकलक : श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) देहली
१. श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध चालू असतांना मेघनादाच्या नागपाशाने श्रीराम आणि लक्ष्मण बंदी होणे, हनुमंताने केलेल्या प्रार्थनेमुळे गरुडाने त्याच्या चोचीने नागपाश तोडणे आणि गरुडाने साहाय्य केल्याबद्दल श्रीरामाने कृतज्ञता व्यक्त करणे
‘श्रीराम आणि रावण यांच्या सेनेमध्ये युद्ध चालू असते. तेव्हा रावणपुत्र मेघनाद त्याच्या नागपाशाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना बंदी बनवतात. श्रीराम आणि लक्ष्मण यांना मूर्च्छित अवस्थेत पाहून सर्वांना काळजी वाटते. तितक्यात हनुमंत वैकुंठात जाऊन श्रीविष्णूचे वाहन गरुड याला घेऊन येतो. हनुमंताच्या प्रार्थनेप्रमाणे गरुड त्याच्या चोचीने श्रीराम आणि लक्ष्मण यांचे नागपाश तोडून टाकतो. झोपेतून उठल्याप्रमाणे श्रीराम आणि लक्ष्मण दोघे उठून बसतात. ‘श्रीराम हात जोडून गरुडाकडे ‘कृतज्ञता’, व्यक्त करतो. श्रीराम म्हणतो, ‘तुमची आणि माझी आधीची ओळख नसतांनाही तुम्ही मला साहाय्य केले’, यासाठी मी तुमचा चिरऋणी आहे.’
२. श्रीरामाचे नामस्मरण केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होत असणे; परंतु ते ‘स्वतः नागपाशाच्या बंधनात कसे ?’, असे प्रश्न गरुडाच्या मनात येणे
वैकुंठाला परत जाता जाता गरुडाच्या मनात पुढील विविध प्रश्न येतात, ‘श्रीराम स्वयं श्रीविष्णूचे अवतार आहेत, तर त्यांना माझे साहाय्य का घ्यावे लागले ?’, श्रीराम स्वयं परब्रह्म आहेत. जे स्वयं मोहमायेच्या पलीकडे आहेत, जे सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहेत, ‘ते अवतार आहेत’, असे सर्व जण म्हणतात; मात्र त्यांच्या वागण्यात मला कुठेही ‘ते अवतार आहेत’, असे का वाटले नाही ? ज्यांचे नामस्मरण केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. ‘आज ते स्वतः नागपाशाच्या बंधनात आहेत, असे कसे ?’
३. गरुडाच्या मनातील शंकेचे उत्तर केवळ काकभुषुंडी महर्षीच सांगू शकणे आणि शिवाने गरुडाला त्यांना शरण जाऊन मनातील सर्व शंका विचारण्यास सांगणे
गरुडाच्या मनात शंका असल्याने त्याला काही केल्या चैन पडेना. कशातही त्याचे मन लागेना. ‘माझ्या मनात अशी शंका आली. हे मी ‘माझे स्वामी श्रीहरिला तरी कसे विचारू ?’, असा विचार करत शेवटी गरुड महर्षि नारदांकडे जातो. महर्षि नारद गरुडाला ब्रह्मदेवाकडे पाठवतात आणि ब्रह्मदेव गरुडाला शिवाकडे पाठवतात. शिव म्हणतो, ‘या प्रश्नाचे उत्तर केवळ एकच जण देऊ शकतात आणि ते म्हणजे काकभुषुंडी महर्षि ! तू त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना शरण जा आणि त्यांना तुझ्या मनातील सर्व शंका सांग.’
४. ‘काकभुषुंडी’ हे ऋषि कावळ्याच्या रूपात असणे आणि प्रलय काळातही त्यांना काही होत नसून ते प्रलय पहाणारे एकमेव ऋषि असणे अन् त्यांनी प्रत्येक श्रीरामावतारात श्रीरामाच्या बाललीला पहाण्यासाठी अयोध्येत निवास करणे
‘काकभुषुंडी’ नावाचे एक ऋषि आहेत. ज्यांना भगवंताचे वरदान प्राप्त झालेले आहे. ते कावळ्याच्या रूपात असतात. प्रलयकाळातही त्यांना काही होत नसून ते प्रलय पहाणारे एकमेव ऋषी आहेत. नील पर्वत हे त्यांचे स्थान आहे. चार युगांच्या कालावधीला आपण ‘मन्वंतर’ म्हणतो. चार युगे संपल्यावर मन्वंतर संपते आणि प्रलय होऊन नवीन मन्वंतराला आरंभ होतो. प्रत्येक मन्वंतरात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अवतार परत होतात. काकभुषुंडी ऋषींनी आतापर्यंत अनेक वेळा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार पाहिले आहेत अन् प्रत्येक श्रीरामावतारात ते श्रीरामाच्या बाललीला पहाण्यासाठी अयोध्येत निवास करतात.
५. कावळ्याच्या रूपात असलेले काकभुषुंडी ऋषींकडे जाऊन मनातील शंका विचारल्याने गरुडाचा अहंकार दूर होऊन त्याच्या मनाचे समाधान होणार असणे, त्यासाठी काकभुषुंडी ऋषींकडे पाठवल्याचे शिवाने पार्वतीला सांगणे
गरुड हा पक्षीराज आहे आणि साक्षात् श्रीविष्णूचे वाहन आहे. तेव्हा पार्वती शिवाला म्हणते, ‘देवा, ‘तुम्हाला उत्तर ठाऊक असतांनाही तुम्ही गरुडाला काकभुषुंडी ऋषींकडे का पाठवले ?’ शिव म्हणतो, ‘अहंकारामुळे गरुडाच्या मनात श्रीरामाविषयी विकल्प निर्माण झाला. गरुड हा पक्षीराज आहे आणि कावळ्याच्या रूपात असलेले काकभुषुंडी ऋषींकडे जाऊन मनातील शंका विचारल्याने गरुडाचा अहंकार दूर होईल. काकभुषुंडीच्या आश्रमात युगानुयुगे श्रीरामाचे कीर्तन चालू आहे. त्या श्रीराममय वातावरणाचा परिणाम होऊन गरुडाच्या मनाचे समाधान होईल.’
६. महर्षि काकभुषुंडींनी गरुडाच्या मनातील सर्व शंकांचे केलेले निरसन
६ अ. आश्रमातील श्रीराम भक्तीच्या वातावरणाचा गरुडावर पुष्कळ परिणाम होऊन त्यांनी मनातील सर्व शंका काकभुषुंडी यांना विचारणे : गरुड नील पर्वतावर काकभुषुंडीच्या आश्रमात पोचतात. गरुडाला ‘मी पक्ष्यांचा राजा आहे, तर एका कावळ्याला कसे विचारू ?’, असे वाटत असते. काकभुषुंडी महर्षि त्रिकालदर्शी असतात. ते गरुडाला आदराने आश्रमात घेतात. काकभुषुंडी ऋषींच्या आश्रमातील श्रीराम भक्तीच्या वातावरणाचा गरुडावर पुष्कळ परिणाम होतो आणि गरुड लीनभावात महर्षि काकभुषुंडींना मनातील सर्व शंका विचारतो.
६ आ. श्रीराम स्वतः संपूर्ण विश्वाचा आधार असून नागपाश तोडण्याच्या माध्यमातून त्याची सेवा करण्याची संधी देणे आणि ही शंका निर्माण करून श्रीरामानेच लीला घडवल्याचे काकभुषुंडी महर्षि यांनी गरुडाला सांगणे : सतत श्रीरामभक्तीमध्ये लीन असणारे काकभुषुंडी महर्षि म्हणतात, ‘पक्षीराजा, श्रीरामाने तुला नागपाश तोडण्याच्या माध्यमातून त्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याला साहाय्य करणारे आपण कोण आहोत ? श्रीराम संपूर्ण विश्वाचा आधार आहे. तुला ‘श्रीरामाला साहाय्य केल्याची कीर्ती मिळावी’; म्हणून मनुष्यरूपातील तो श्रीराम स्वतः बंधनात जायलाही सिद्ध झाला. सेवकासाठी त्याचे स्वामी सामान्य मनुष्याच्या स्तराला येऊन सेवकाला सेवेची संधी देतात, हेच तर त्यांचे प्रेम आहे आणि आता तुझ्या मनात ही शंका निर्माण करून श्रीरामानेच ही लीला घडवली आणि तुला माझ्याकडे पाठवले.
६ इ. ‘प्रत्येक अवतारात श्रीरामाची लीला निराळी असून त्या लीलांमधील ‘आनंद घेणे आणि भगवंताला शरण जाणे’ एवढेच करू शकत असल्याचे काकभुषुंडी महर्षि यांनी गरुडाला सांगणे : श्रीरामाला आता तुझ्या माध्यमातून मलाही पुढे करायचे आहे. ही सर्व श्रीरामाची लीला आहे. तो श्रीहरि आता मनुष्यरूपात आहे. जसा एक नट त्याची भूमिका करत असतांना नाटकातील पात्राशी एकरूप होतो, तसे भगवंताचे वागणे आहे. मनुष्यरूपातील श्रीराम साक्षात् भगवंत आहेत; कारण ते स्वतंत्र आहेत आणि बाकी सर्व जण पारतंत्र्यात आहेत. हे गरुडा, तू तर या मन्वंतरातील श्रीरामावतार पाहिले आहेस. मी वेगवेगळ्या मन्वंतरांमधील आणि ब्रह्मांडातील श्रीरामावतार पाहिले आहेत. प्रत्येक अवतारात त्यांची लीला निराळी असते. त्या लीलांचा ‘आनंद घेणे आणि भगवंताला शरण जाणे’ एवढेच आपण करू शकतो.’
७. भगवंताच्या जवळ असूनही गरुडाच्या मनात निर्माण झालेला संदेह भगवंताचे भक्त काकभुषुंडी ऋषि यांच्या सत्संगाने दूर होणे
त्यानंतर काकभुषुंडी ऋषींनी श्रीरामाच्या निरनिराळ्या अवतारांमध्ये त्यांच्याशी श्रीरामाचे झालेले संभाषण गरुडाला सांगितले. श्रीरामाच्या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन केले. शिष्य गरुडाच्या मनातील शंका गुरु काकभुषुंडी ऋषींच्या सत्संगाने दूर होतात. विशेष म्हणजे पक्षीराज गरुड आणि महर्षि काकभुषुंडी दोघेही श्रेष्ठ हरिभक्त आहेत. गरुड तर साक्षात् भगवंताच्या सान्निध्यात असतात आणि काकभुषुंडी ऋषि भगवंताची भक्ती करत नामानिराळे असतात. भगवंताच्या जवळ असूनही गरुडाच्या मनात संदेह निर्माण होतो. जो संदेह वैकुंठापासून दूर अज्ञात स्थळी रहाणारे भगवंताचे भक्त काकभुषुंडी ऋषि दूर करतात. त्यामुळे देवाने या माध्यमातून हेही दाखवून दिले, ‘केवळ देवाच्या जवळ रहाणे, एवढेच पुरेसे नाही.’
८. भगवंताच्या लीलेमध्ये समष्टीचे कल्याण दडलेले असणे; परंतु भगवंताविषयी मनात विकल्प निर्माण झाल्यास अनेक वर्षांच्या श्रद्धेचा कस लागणे
मनुष्यरूपात येऊन भगवंत जे कार्य करत असतो, त्याला आपण ‘लीला’ म्हणतो, ज्याच्यात समष्टीचे कल्याण दडलेले असते. भगवंताच्या लीला समजणे भल्या भल्यांनाही शक्य झाले नाही. आपण तर सर्वसामान्य साधक आहोत. सर्वसामान्य साधकाला भगवंताचे प्रेम मिळाले, यानेच तो संतुष्ट होतो; मात्र त्याच साधकांमध्ये येनकेनप्रकारेण भगवंताविषयी मनात विकल्प निर्माण झाला, तर त्याने साधकाच्या अनेक वर्षांच्या श्रद्धेचा कस लागतो. साधनेचा पाया हलायला लागतो आणि भगवंताच्या कृती त्याला ‘लीला’रूपात दिसत नाहीत.
९. ‘मनात विकल्प आल्यास त्याचे समाधान शोधून गुरुभक्ती वाढवणे’, हाच त्यावर पर्याय असणे
आम्ही सर्व सनातन संस्थेचे साधक भाग्यवंत आहोत. आम्हा सर्वांना श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सहवास लाभला. सहस्रो साधकांनी गुरुदेवांना जवळून पाहिले. त्यांच्या सत्संगाचा लाभ मिळाला. बघता बघता सनातन संस्थेच्या स्थापनेला २४ वर्षे उलटून गेली आहेत. वर्ष २०२४ मध्ये सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण होणार असून हिंदु राष्ट्र स्थापनेची घटिका जवळ येणार आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांना आपत्काळासाठी सिद्धता करा’, असे सांगून काही वर्षे उलटूनही ‘आपत्काळ अजून का आला नाही ?’, असे एखाद्या साधकाच्या मनात आलेही असेल. ‘आपण गुर्वाज्ञापालन म्हणून जी आपत्काळाची सिद्धता केली, ती योग्य होती ना ?’, असेही एखाद्या साधकाच्या मनात आले असेल. सांगायचा मुख्य विषय असा की, ‘मनात विकल्प येणारच नाही’, हे आपल्या हातात नाही; मात्र त्यावर समाधान शोधून गुरुभक्ती वाढवणे’, हाच त्यावरील पर्याय आहे.’
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांसाठी विविध सेवा आणि उपक्रम दिले असून साधकांना मिळालेली सेवा त्यांनी भक्तीभावाने आणि श्रद्धेने करणे
श्रीविष्णु आता पृथ्वीवर गुरुरूपात आलेले आहेत. सनातन संस्थेच्या साधकांना ते साधनेतील मार्गदर्शन करत आहेत. श्रीविष्णूची लीला अगाध आणि लोककल्याणार्थ आहे. मनुष्यरूपात असलेल्या श्रीविष्णूची सेवा करायला मिळावी; म्हणून गुरुदेवांनी आम्हा साधकांसाठी विविध सेवांचे मार्ग आणि उपक्रम दिलेले आहेत. आपल्याला मिळालेली सेवा भक्तीभावाने आणि श्रद्धेने करणे, एवढेच आपल्या हातात आहे. गुरुदेवांच्या बोलण्याचा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा, त्यांच्या कृतींचे बुद्धीने विचार करून त्यांचे कार्यकारणभाव समजण्यासाठी प्रयत्न करणे निरर्थक आहे.
‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी. आम्हा साधकांना एकमेकांकडून शिकत आणि सतत संघटित राहून तुम्ही सांगितलेल्या साधनामार्गावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार सतत सेवारत रहाता येवो’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) देहली, (१७.९.२०२३)