पौराणिक काळातील योद्ध्यांचे प्रकार आणि त्यांचे सामर्थ्य !
रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथा यांमधील योद्ध्यांचे सामर्थ्य अन् पदव्या यांविषयी आपण सर्वांनी अनेकदा वाचले आहे. या ग्रंथांमध्ये सामान्यतः येणारा शब्द ‘महारथी’ हा आहे. हा शब्द इतका सामान्य करण्यात आला आहे की, आपण कोणत्याही प्रसिद्ध योद्ध्यासाठी ‘महारथी’ हा शब्द वापरतो. वास्तविक पहाता ‘महारथी’ ही एक पुष्कळ मोठी पदवी होती. काही मोजकेच निवडक योद्धे ‘महारथी’च्या पदवीपर्यंत पोचू शकत होते. ही पदवी प्राप्त करण्यासाठी पात्रतासुद्धा आवश्यक होती. याविषयी आपल्याला माहिती आहे का ? आज आपण पौराणिक काळातील योद्ध्यांचे प्रकार आणि त्यांचे सामर्थ्य यांविषयी जाणून घेणार आहोत. येथे आपण सामान्य सैनिकांविषयी जाणून घेत नसून उच्च दर्जाच्या योद्ध्यांविषयी जाणून घेत आहोत.
पुरातन काळातील ६ श्रेणींमध्ये विभागले गेलेले मुख्य योद्धे !
१. अर्धरथी
अर्धरथी हा एक प्रशिक्षित योद्धा होता, जो शस्त्रे हाताळण्यात कुशल असे. एकटा अर्धरथी २ सहस्र ५०० सशस्र योद्ध्यांचा सामना करू शकत होता. रामायण आणि महाभारत यांविषयी बोलायचे झाल्यास या युद्धांमध्ये असंख्य अर्धरथी सहभागी झाले होते. महाभारत युद्धातील योद्ध्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करतांना पितामह भीष्माने कर्णाला ‘अर्धरथी’ मानले होते. ‘याच कारणामुळे कर्णाने भीष्माच्या कारकिर्दीत युद्धात सहभाग घेतला नाही’, असे अनेक लोकांचे मानणे आहे.
२. रथी
रथी म्हणजे जो सर्व प्रकारची अस्त्रे-शस्त्रे हाताळण्यात पारंगत आहे आणि जो २ अर्धरथींचा सामना करू शकतो, म्हणजेच एकाच वेळी ५ सहस्र सशस्त्र योद्ध्यांचा सामना करू शकतो, तो योद्धा म्हणजे रथी होय ! रामायणात अनेक रथी सहभागी झाले होते; मात्र याचे तपशीलवार वर्णन सापडत नाही. राक्षसांमध्ये खर, दूषण, तडका, मारीच, सुबाहु, वातापी इत्यादी रथी होते. वानरसेनेमध्ये गंधमादन, मैन्द आणि द्विविन्द, हनुमानाचे पुत्र मकरध्वज, शरभ आणि सुषेण यांना रथी मानले जात असे. महाभारताच्या काळात सर्व कौरव, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, शकुनी, त्याचा मुलगा उलुक, उपपांडव (प्रतिविंद्य, सुतसोम, श्रुतकर्म, शतानिका आणि श्रुतसेन) विराट, उत्तर, शिशुपालाचा मुलगा धृष्टकेतु, जयद्रथ, शिखंडी, सुदक्षिणा, शंख, श्वेत, इरावान, कर्णाचे सर्व पुत्र, सुशर्मा, उत्तमौजा, युधामन्यु, जरासंधाचा पुत्र सहदेव, बाल्हीक पुत्र सोमदत्त, कंस, अलम्बुष, अलायुध, बृहदबल या सर्वांची गणना रथीच्या रूपात होत होती. दुर्योधन हा ८ रथींच्या योग्यतेचा मानला जातो.
३. अतीरथी
एक असा योद्धा ज्याला सामान्य शस्त्रांसह अनेक दैवी शस्त्रांचे ज्ञान आहे आणि जो युद्धात १२ रथींचा म्हणजेच ६० सहस्र सशस्त्र योद्ध्यांचा सामना एकाच वेळी करू शकतो, तो म्हणजे अतीरथी ! रामायणामध्ये लव, कुश, अकम्पन्न, बिभीषण, देवान्तक, नरान्तक, महिरावण, पुष्कल, अंगद, नल, नील, प्रहस्त, अकम्पन, भरतपुत्र पुष्कल, त्रिशिरा, अक्षयकुमार, हनुमानाचे वडील केसरी इत्यादी अतीरथी होते. महाभारताच्या काळात भीम, जरासंध, धृष्टधुम्न, कृतवर्मा, शल्य, भूरिश्रवा, द्रुपद, घटोत्कच, सात्यिकी, कीचक, बाल्हीक, साम्ब, प्रद्युम्न, कृपाचार्य, शिशुपाल, रुक्मी, साित्यकी, नरकासुर, प्रद्युम्न, कीचक हे अतीरथी होते.
४. महारथी
ही सर्वांत प्रसिद्ध पदवी होती. ती मिळवणारे सर्व योद्धे जगभरात आदरणीय आणि प्रसिद्ध होते. महारथी हा सर्व ज्ञात शस्त्रे आणि अनेक दैवी शस्त्रे वापरण्यास सक्षम असलेला योद्धा होता. युद्धात महारथी हा १२ अतीरथी किंवा ७ लाख २० सहस्र सशस्त्र योद्ध्यांचा सामना करू शकत होता. ज्यांच्याकडे ब्रह्मास्त्राचे ज्ञान होते (निवडक योद्ध्यांकडेच हे ज्ञान होते), ते थेट महारथींच्या श्रेणीमध्ये येतात.
रामायणामध्ये भरत, शत्रुघ्न, अंगद, सुग्रीव, अतिकाय, कुंभकर्ण, प्रहस्त, जांबुवंत हे महारथीच्या श्रेणीत येतात. रावण, वाली आणि कार्तवीर्य अर्जुन यांना एकापेक्षा अधिक महारथींच्या समान मानले जात असे. महाभारतात अभिमन्यू, बभ्रुवाहन, अश्वत्थामा, भगदत्त, बर्बरीक हे महारथी होते. भीष्म, द्रोण, कर्ण, अर्जुन आणि बलराम यांनाही एकापेक्षा अधिक महराथींच्या समान मानले जात असे. पाशुपतास्त्र मिळाल्यामुळे काही ठिकाणी अर्जुनाला ‘अतीमहारथी’ असेही म्हणतात; मात्र कोणताही लिखित संदर्भ नाही.
५. अतीमहारथी
या वर्गातील योद्धे दुर्मिळ होते. जो १२ महारथी योद्ध्यांचा म्हणजेच ८६ लाख ४० सहस्र सशस्त्र योद्ध्यांचा सामना एकटा करू शकतो, तसेच ज्याला सर्व प्रकारच्या दैवी शक्तींचे ज्ञान आहे, तो योद्धा म्हणजे अतीमहाराथी !
महाभारताच्या काळात केवळ भगवान श्रीकृष्णाला ‘अतीमहारथी’ मानले जाते. रामायण काळात भगवान श्रीराम हे अतीमहारथी होते. त्यांच्या व्यतिरिक्त मेघनाद यालाही अतीमहारथी मानले जाते; कारण ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र आणि पाशुपतास्त्र ही तिन्ही महाअस्त्रे ज्ञात असलेला तो एकमेव योद्धा होता. या व्यतिरिक्त लक्ष्मणालाही या सर्व दिव्यास्त्रांचे ज्ञान होते. त्यामुळे काही ठिकाणी त्यालाही या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भगवान परशुराम आणि महावीर हनुमान यांचेही अनेक ठिकाणी अतीमहारथी म्हणून वर्णन केले गेले आहे.
६. अन्य
भगवान विष्णूचे अवतार, विशेषतः वराह अवतार आणि नरसिंह अवतार यांनाही अतीमहारथीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. कार्तिकेय, श्री गणेश आणि वैदिक काळातील ग्रंथांमध्ये इंद्र, सूर्य आणि वरुण यांसारख्या काही देवतांनाही अतीमहारथी मानले जाते. आदिशक्तीच्या १० महाविद्या, नवदुर्गा आणि रुद्रावतार, विशेषतः वीरभद्र आणि भैरव यांनाही अतीमहारथी मानले जाते.
अद्याप कुणालाही साध्य न झालेली महामहारथी पदवी !
हा कोणत्याही प्रकारच्या योद्ध्यांचा सर्वोच्च स्तर मानला जातो. जो २४ अतीमहारथी म्हणजेच २० कोटी ७३ लाख ६० सहस्र सशस्त्र योद्ध्यांचा सामना करू शकतो, तसेच सर्व प्रकारच्या दैवी आणि महाशक्ती ज्यांच्या अधीन आहेत, ज्यांचा कुणीही पराभव करू शकत नाही, अशा योद्ध्याला ‘महामहारथी’ म्हणतात. आजपर्यंत पृथ्वीवरील कोणताही योद्धा किंवा अवतार या स्तरावर पोचला नाही. याचे एक कारण म्हणजे एका कालखंडातच नव्हे, तर संपूर्ण कल्पामध्येही अद्याप २४ अतीमहारथी झालेले नाहीत. केवळ त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णु आणि महेश) आणि आदिशक्ती यांनाच इतके शक्तीशाली मानले जाते.
(संदर्भ : विविध संकेतस्थळे)
आपल्याला एखादा योद्धा सर्वांत अधिक आवडतो; म्हणून आपण त्याला पहिल्या श्रेणीत ठेवू शकत नाही. कोणताही योद्धा केवळ त्याच्या शारीरिक सामर्थ्यानेच नव्हे, तर त्याला मिळालेल्या दैवी शस्त्रांच्या आधारे प्रमाणित केला जातो, उदा. अर्जुन शारीरिक सामर्थ्यात भीमाच्या पुष्कळ मागे होता; परंतु दैवी शस्त्रांच्या विषयात त्याच्या पुष्कळ पुढे होता.
रामायण आणि महाभारत यांतील योद्ध्यांची तुलनाही करू शकत नाही. त्यांच्या काळातील त्यांच्या समतुल्य योद्ध्यांच्या विषयी त्यांची शक्ती पहाणे आवश्यक आहे. अन्यथा रामायण काळातील सामान्य योद्धेही महाभारतकाळातील महारथींपेक्षा अधिक शक्तीशाली होते. देवतांची तुलनाही आपण करू शकत नाही. त्यांची शक्ती त्यांच्यासमोर असलेले देव किंवा राक्षस यांच्या संदर्भात त्या त्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असते. |