दसरा : भक्ती आणि शक्ती यांचा सण !
दसरा येण्याआधी आपण नवरात्र हा उत्सव साजरा करतो. नवरात्रात शक्तीची उपासना केली जाते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारतातील महायुद्धाला आरंभ होण्यापूर्वी श्री दुर्गादेवीची उपासना करण्यास सांगितले. शक्तीची उपासना केल्याविना आपल्याला समाजातील राक्षसी प्रवृत्ती नष्ट करता येत नाही. महिषासुराला मारण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या आद्यदेवतांची शक्ती दुर्गामातेच्या रूपात अवतीर्ण झाली. आसुरी वृत्तीवर विजय संपादन करण्यासाठी दैवी शक्तीची कृपा संपादन करावी लागते. ही कृपा संपादन करण्यासाठी भक्ती उपयुक्त ठरते. अशा प्रकारे शक्ती प्राप्त करण्यासाठी भक्तीभावाने ९ दिवस केलेली आराधना फलद्रुप होऊन १० वा दिवस ‘विजयादशमी’चा दिवस म्हणून उगवतो. अर्थात् ही शक्ती उपासना केवळ ९ दिवस करून भागत नाही, हेही तेवढेच सत्य आहे. त्यासाठी ९ दिवसांच्या असंख्य नवरात्री जागवाव्या लागतात. अशा अनंत नवरात्रीत मानवी समाजात संस्कृती आणि राष्ट्र यांच्या प्रतीची निष्ठा निर्माण करण्यासाठी सुस्त समाजाला जागृत करायचे आहे.
संकलक : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
१. दुर्गुणांना नष्ट करण्यासाठी भक्ती आणि शक्ती यांची अखंड उपासना !
मानवी समाजाला उपद्रव देणारा आसुरी समाज अनादी कालापासून अस्तित्वात आहे. वेळोवेळी अशा आसुरी वृत्तीच्या समाजाने मानवी समाजाला हैराण केले आहे. असुरांकडे प्रचंड बळ असते, तेवढे बळ मानवी समाजाकडे आढळत नाही; म्हणून माणसाला ही आसुरी वृत्ती नष्ट करण्यासाठी दैवी शक्तीचे साहाय्य घ्यावे लागते. शौर्य, पौरुषत्व आणि पराक्रम यांची आवश्यकता आहे. केवळ सद्विचाराने आसुरी वृत्ती नष्ट होत नाही आणि नष्ट करताही येत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आसुरांचे प्राबल्य वाढते, तेव्हा तेव्हा आळस झटकून आपल्यातील दुर्गुणांना नष्ट करून शक्तीयुक्त व्हावे लागते. त्यासाठी असंख्य नवरात्री जागून काढाव्या लागतात. भक्ती आणि शक्ती यांची अखंड उपासना करावी लागते, तेव्हा संघशक्ती निर्माण होते. अशी संघशक्ती निर्माण झाल्यावाचून क्रौर्य नष्ट करता येत नाही आणि शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करता येत नाही.
२. सज्जनांचे रक्षण आणि दुष्ट प्रवृत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी शक्ती उपासना !
पुराण काळातील सर्व घटनांकडे आपण लक्ष दिले असता आपल्याला एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते की, सज्जन समाजाला सातत्याने दुष्ट शक्तींशी संघर्ष करावा लागला आणि स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागले. हा एक सृष्टी क्रमच असल्याचे आपल्याला जाणवते. जेव्हा मानवी समाज दुर्बल होतो, त्या वेळी दुष्ट शक्ती दुर्बल असलेल्या मानवी समाजाला नष्ट करण्यासाठी पुढे सरसावते. म्हणून मानवी समाजाच्या पर्यायाने सज्जनांच्या रक्षणासाठी शक्ती उपासना करावीच लागते आणि तिचे साहाय्य घ्यावेच लागते.
आजही आपल्याला दुष्ट, दुर्जन प्रवृत्तींचा उपद्रव होत आहे. त्यांच्यावर मात करण्यासाठी, हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी आपल्याला वैचारिक, बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक असे सर्व प्रकारचे बळ अन् शक्ती संपादन करायची आहे. राष्ट्ररक्षणासाठी आणि खलप्रवृत्ती नष्ट करण्यासाठीच ही शक्ती वापरायची आहे.
३. नवरात्र अन् विजयादशमी या २ महान सणांचे महत्त्व !
हिंदु संस्कृती या सर्व गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी नवरात्र उत्सव आणि त्यानंतर येणारा दसरा या २ महान सणांचे महत्त्व समजावून सांगत आहे. जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आहे, तिथे विजय, लक्ष्मी, कल्याण आणि शाश्वत शांती यांचा लाभ होतो. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे भगवंताची कृपा आणि धनुर्धर पार्थ म्हणजे मानवी प्रयत्न ! ईश्वराची कृपा असल्यापासून मानवी प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. हा सिद्धांत हिंदु संस्कृतीने आपले मन आणि चित्त यांवर ठसवण्यासाठीच नवरात्र अन् विजयादशमी या दोन उत्सवांची सांगड घातली आहे.
४. शासनकर्त्यांनी शस्त्राचाराचा आधार घेण्याची आवश्यकता !
हिंदु संस्कृतीने वीरता श्रेष्ठ मानली आहे. ही वीरता, हे शौर्य उच्च आणि उदात्त मूल्य जतन करण्यासाठीच उपयोगात आणायचे आहे. न्याय, नैतिकता आणि सत्य यांचा कैवार घेण्यासाठीच शस्त्राचाराला अनुमती दिली आहे. समाजातील अराजकता नष्ट करून शांतता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी शासनकर्त्यांनी शस्त्राचाराचा आधार घेतला असल्याची साक्ष आपला इतिहास देतो. प्रत्येक राष्ट्र स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सशस्त्र सेना बाळगते. जनावरांनाही स्वतःच्या संरक्षणासाठी निसर्गाने विविध प्रकारची शारीरिक क्षमता बहाल केली आहे. आत्मरक्षण, स्वतःचे अस्तित्व टिकवणे, हा मानवाचा निसर्गदत्त अधिकार आहे. हा अधिकार बजावण्यासाठी हिंदु संस्कृतीने शक्ती उपासनेचा संस्कार केला आहे.
५. शक्ती साधना अखंड चालू ठेवण्यामागील कारणमीमांसा
आपल्याला शक्ती प्राप्त झाल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होण्याची शक्यता असते. स्वतःची बुद्धी भ्रष्ट होऊ नये म्हणून सद्बुद्धीची मागणी भगवंताकडे करायची असते. आपलेपणा, आपुलकी, मानवता, श्रद्धा, आदर, सद्भावना या आणि अशा अनंत गोष्टींचा अंगीकार करावा लागतो. अन्यथा द्वेष, मत्सर उफाळून येऊन सर्व जळून खाक होईल, याचे भान ठेवून आपण वावरणे आवश्यक आहे.
शत्रूने आपल्या राज्यात घुसून लूटमार केल्यानंतर युद्धाची सिद्धता करण्याविषयी हिंदु संस्कृती सांगत नाही. शत्रूचे वर्तन, त्याची वृत्ती, त्याची दुष्कृत्ये लक्षात येताच त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याला आपल्या धाकात ठेवण्याचे संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केले आहेत. शत्रूला वेळीच पायाखाली दाबून टाकल्याविना आपल्याला शांततेने जगता येत नाही आणि स्वतःची प्रगती, विकासही साधता येत नाही. ‘दुष्ट प्रवृत्तीने आपल्या राष्ट्रात बस्तान बसवल्यावर दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी अपार कष्ट पडतात. शक्ती, धन आणि काळ यांचा अपहार होतो. या परिस्थितीपासून राष्ट्राचा बचाव करण्यासाठीच शक्ती साधना अखंड चालू ठेवा’, असा संदेश हिंदु संस्कृती सातत्याने आपल्याला देत आहे. त्यासाठीच प्रतिवर्षी नवरात्री उत्सव, शारदा उत्सव साजरा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.
६. संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्र जिवंत हवे !
प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, छत्रपती शिवराय यांनी त्यांच्या त्यांच्या वेळच्या दुष्प्रवृत्तींना नष्ट केले. आपल्यालाही आपल्या काळातील दुष्प्रवृत्तींचा वैध मार्गाने समाचार घ्यायचा आहे. त्यावर विजय संपादन करायचा आहे. आपले स्वत्व आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे. स्वातंत्र्य आणि स्वत्व सुरक्षित राहिले, तरच आपले राष्ट्र जिवंत राहील. जिवंत राष्ट्रच संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करू शकते. वर उल्लेखलेले सर्व महापुरुष आणि अवतारी पुरुष यांनी त्यांच्या कृतीतून ही शिकवण आपल्याला दिली आहे.
७. शौर्याची पूजा करून राष्ट्र आणि संस्कृती यांचे संरक्षण करणे, हेच जीवनाचे ध्येय !
शक्तीची उपासना करून प्राप्त झालेले सामर्थ्य, वैभव आपण एकट्यानेच उपभोगायचे नाही, तर त्याचा उपयोग सर्वांना झाला पाहिजे. समाजातील दीनता, हीनता, लाचारी, भोगवृत्ती नष्ट करण्यासाठीच आपण कटिबद्ध असले पाहिजे. मानवा मानवामधील भेद नष्ट करायचा आहे. भोगवृत्तीचा संहार करून कर्तव्यवृत्ती जगवायची आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि अहंकार यांच्यावरही विजय संपादन करायचा आहे. त्यासाठीच आपण कटिबद्ध असले पाहिजे. शौर्याचा शृंगार आणि पराक्रमाची पूजा करून राष्ट्र अन् संस्कृती यांचे संरक्षण हेच जीवन ध्येय हिंदु संस्कृतीने आपल्यासमोर ठेवले आहे. त्याचेच प्रतीक म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा सण दसरा होय !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२.१०.२०२३)