२६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्ह्यातील चिपळूण ते संगमेश्वर रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी गुरुवार, २६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत मेगाब्लॉक (मेगाब्लॉक म्हणजे अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणार्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
यात , गाडी क्र. ०११३९ नागपूर – मडगाव जंक्शन ही गाडी २५ ऑक्टोबर या दिवशी कोलाड ते चिपळूण या स्थानकांच्या दरम्यान १०० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे.
गाडी क्र. १२०५१ मुंबई सी.एस्.एम्.टी.- मडगाव जंक्शन (जनशताब्दी एक्सप्रेस) ही गाडी २६ ऑक्टोबर या दिवशी कोलाड ते चिपळूण या स्थानकांच्या दरम्यान ४० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे.
गाडी क्र. १६३४६ थिरूवअनंतपूरम् – लोकमान्य टिळक (नेत्रावती एक्सप्रेस) ही गाडी २५ ऑक्टोबर या दिवशी रत्नागिरी ते संगमेश्वर या स्थानकांच्या दरम्यान ४० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे.
या ‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.