सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करा !

रत्नागिरीतील हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून पोलिसांत तक्रार

रत्नागिरी शहर पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांना तक्रार अर्ज देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

रत्नागिरी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या समवेत पत्रकार निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही प्रक्षोभक वक्तव्य (हेट स्पीच) केल्याविषयी भारतीय दंड संहिता कलम १५३(ए), १५३(बी), २९५(ए), २९८, ५०५ आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे तात्काळ नोंद करावेत आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून करण्यात आली. याविषयीची लेखी तक्रार हिंदुत्वनिष्ठ श्री. केशव भट, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतंजलि योग समिती, श्री मरुधर विष्णु समाज, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांना तक्रार अर्ज देण्यात आला असून त्याची प्रत रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनाही देण्यात आली आहे. याविषयी ‘योग्य तो निर्णय घेऊन तो कळवू, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांशीही याविषयी चर्चा करू’, असे पोलीस अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांना तक्रार अर्जाची प्रत देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

तक्रार प्रविष्ट करतांना सर्वश्री राकेश नलावडे, अधिवक्ता सचिन रेमणे, प्रदीप दांडेकर, तेजस साळवी, चंद्रकांत राऊळ, राजेंद्र फाळके, भोलाराम चौधरी, अजिंक्य केसरकर, तुषार देसाई, संजय जोशी, गोविंद भारद्वाज, विराम चौधरी, अरविंद बारस्कर आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या तक्रारअर्जात म्हटले आहे की, 


भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’च्या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार समाजात कुणीही द्वेष पसरवणारे वक्तव्य करून जर समाजात ‘हेट स्पीच’ करण्याचा प्रयत्न करील, तर  त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची, अन्य कुणी व्यक्तीने तक्रार प्रविष्ट करण्याची वाट न पहाता सरकारने स्वतःच दखल घेऊन एफ्.आय.आर्. दाखल केली पाहिजे, तसेच असे करण्यात जर विलंब केला जात असेल, तर त्याला मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणे मानले जाईल.

तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री, उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नईतल्या कामराज मैदानात, ‘भारतीय मुक्ती संग्रामातील आर्.एस्.एस्.चे योगदान’ या विषयावरील व्यंगचित्रांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ‘डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही, त्यांना नष्ट केले पाहिजे. त्याचप्रमाणे सनातन (धर्म) देखील नष्ट केला गेला पाहिजे’, असे वक्तव्य केले.

कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी ही ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून त्याला नष्ट करण्याची भाषा वापरली आहे.

फेसबुक या सामाजिक माध्यमातून पत्रकार निखिल वागळे यांनी उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करतांना ‘सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखाच आहे. उदाहरण हवे असेल, तर याच धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा’, असे बेजबाबदार आणि द्वेषपूर्ण ‘पोस्ट’ केली आहे.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही विधान केले आहे की, सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे.

‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कारवाई वेळेत न झाल्यास नाईलाजाने आम्हाला सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून मा. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याच्या संदर्भात दाद मागावी लागेल आणि त्यासाठीचे दायित्व आपल्या विभागाचे असेल, असेही या तक्रार अर्जांत म्हटले आहे.