हिंदूंनो ! अजिंक्य समाज आणि त्यांचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यास पात्र असते, हे लक्षात घ्या !
विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश !
‘श्रीदुर्गादेवीने महिषासुराचा केलेला वध आणि प्रभु श्रीरामाने रावणाचा केलेला वध यांचे स्मरण करून देणारा दिवस म्हणजे विजयादशमी !
हिंदूंच्या सर्वशक्तीमान देवता अजिंक्य असल्याने त्यांचा विजयदिन ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. आजकाल विजयादशमीच्या दिवशी गावाच्या वेशीवरील मंदिरात जाऊन सीमोल्लंघन करणे आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देणे या कृती केवळ कर्मकांड म्हणून केल्या जात आहेत. मुळात ‘सीमोल्लंघनाची परंपरा देशात का निर्माण झाली ?’, याचा विचार हिंदु समाज कधी करतो का ? ‘आक्रमण हाच बचावाचा सर्वाेत्तम मार्ग असतो’, हे प्राचीन काळातील हिंदु राज्यकर्त्यांना ज्ञात होते; म्हणून शत्रूच्या सीमा उल्लंघण्याची शौर्यपरंपरा देशात निर्माण झाली. आजकाल ही परंपरा लुप्त होऊन ‘निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाचा विजय म्हणजे हिंदूंचा विजय’, असे मानले जाऊ लागले आहे. प्रत्यक्षात नूंह येथील दंगल, मणीपूर येथील हिंसाचार, कन्हैयालालचे केले गेलेले ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद), श्रद्धा वालकरचे केले गेलेले ३५ तुकडे, या घटना पाहिल्या, तर सर्वत्र हिंदु समाज पराभवाच्या छायेत जगत असल्याचे लक्षात येते. अशा वातावरणात विजयादशमी साजरी करणे, ही केवळ औपचारिकता आहे. चंद्रयानाने चंद्राची सीमा ओलांडली, तरी ती वैज्ञानिक प्रगती आहे. त्याद्वारे हिंदूंचे सीमोल्लंघन घडले, असे म्हणणे अयोग्य आहे.
हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले