पुणे येथील जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले !
जेजुरी (जिल्हा पुणे) – जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी दीड मासांपासून बंद ठेवण्यात आले होते. मंदिर दुरुस्तीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने २१ ऑक्टोबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, अशी माहिती ‘श्री मार्तंड देवस्थान’चे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा बंद असल्याने जेजुरीत येणार्या भाविकांची संख्या घटली होती. त्यामुळे जेजुरीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. आता खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने दसर्यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंदिर दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यामुळे मंदिर बंद ठेवावे लागले होते. खंडोबा देवस्थानकडून दसरा सोहळ्याची जय्यत सिद्धता चालू असून गडाला आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.