महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
‘नवरात्रीत ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते. दुर्गेचे स्तवन आणि पूजा करतांना अभिषेक प्रसंगी तिची नामावली म्हणतात. त्या नामावलीवरून स्त्रीच्या ठिकाणी कोणते गुण असावेत, याचा निर्देश झाल्याविना रहात नाही. या नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास येथे देत आहे. २१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगीदेवी, जिल्हा नाशिक’, या देवींची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
७. श्री साळवणदेवी, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
श्रीगोंदा रेल्वेस्थानकापासून १८ किलोमीटर अंतरावर साळवणदेवीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे होमहवन करण्यात येते, तसेच सप्तशतीचा पाठ करण्यात येतो. मंदिराच्या गाभार्यात एक भव्य असा शेंदरी तांदळा आहे. हा तांदळा म्हणजेच श्री साळवणदेवी. ही देवी अत्यंत जागृत आहे. साळवणदेवी ही माहूरच्या रेणुकादेवीचे स्थान आहे, असेही मानले जाते.
‘श्रीगोंदाच्या एकनाथ पाठक नावाच्या भक्तास वृद्धत्वामुळे माहूरला जाणे अशक्य वाटू लागले. तशाही स्थितीत ते तिकडे गेलेच आणि त्यांनी ‘आपणास यापुढे प्रतिवर्षी माहूरला येता येणार नाही. या कठीण प्रसंगात तू मार्ग दाखव’, अशी देवीला प्रार्थना केली. त्या वेळी देवीने ‘आपण मी तुझ्याच बरोबर गावी येईन; पण घरी पोचेपर्यंत मला पाहू नकोस’, अशी त्यांना आज्ञा दिली. ‘श्रीगोंदा नजीक आल्यावर मात्र खरोखरच देवी आपल्या पाठोपाठ आली आहे का ?’, हे पहाण्याची त्यांना इच्छा झाली; म्हणून त्यांनी मागे पाहिले, तो देवी तेथेच अदृश्य झाली’, अशी कथा आहे. श्री साळवणदेवी या भागातील अनेक घराण्यांची कुलदेवता आहे.
८. श्री कालरात्रीदेवी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे वैजनाथच्या परिसरात श्री कालरात्रीदेवीचे स्थान आहे. हे स्वयंभू स्थान असून प्राणिमात्रांचा मोह, संभ्रम अशा अवस्थांचा नाश करणारी ही देवता मानली जाते. वेदांमध्ये हीचे एक शक्तीसूत्र आहे. महाकोशल देशाचा राजा विश्वपती याच्या मुलास भ्रम झाला. त्याने या ठिकाणी लक्षावधी अनुष्ठाने केल्याने त्याचा भ्रमविकार नाहीसा झाल्याची कथा आहे.
दसर्याच्या दिवशी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग प्रभूंची पालखी मिरवणुकीने श्री कालरात्रीदेवीच्या मंदिरात येते आणि तेथून दोन्ही पालख्या ‘सदानंदीचा उदे उदे, वैजनाथ प्रभु की जय !’ या जयघोषात सीमोल्लंघनास जातात. परळीच्या आसमंतातच नारायण पर्वताच्या आग्नेय दिशेला ४ किलोमीटरवर गोधुधाम पर्वतावर अंबाआरोग्य भवानीदेवीचे स्थान आहे. जगातील वैद्यांचा नाथ याच क्षेत्री असल्याने त्याच्या औषधी आणि वनस्पती यांची साठवण येथे आरोग्य भवानीने केली आहे. दुर्मिळ वनस्पती प्राप्तीसाठी दूरदूरचे वैद्य येथे येतात.
श्रीधनमांना (ढोमणा) देवी क्षेत्र आणि दक्षिणेच्या वाटेवर पर्वताच्या उत्तरेस ढोमणादेवीचे स्थान आहे. हिच्या खाली अगणित द्रव्य आहे, अशी आख्यायिका आहे. एका राजाला या द्रव्याची इच्छा झाली. त्याला असे कळले की, मुंज झालेल्या (बटू) पहिल्या मुलाचा जो कुणी बळी देईल, त्याला ते द्रव्य प्राप्त होईल. राजाने एका ब्राह्मण जोडप्याला त्यासाठी सिद्ध केले. बलीदानाच्या दिवशी बटूच्या हा प्रकार लक्षात आला, तेव्हा त्याने या देवीचीच करुणा भाकली. देवीने मुलाचे आईबाप आणि राजा यांचा वध केला अन् बटूचे रक्षण केले. देवीला मूळस्थानावरून उचलून नव्या घाटाच्या पायथ्यापाशी आणून ठेवले आहे. या स्थानांतरालाही द्रव्याच्या आख्यायिकेचीच प्रेरणा कारणीभूत असल्याचे समजते.
९. आणव्याची आजूबाई, जिल्हा संभाजीनगर
मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याकडे जातांना संभाजीनगर-अजिंठा मार्गावरील गोळेगाव बसस्थानकापासून अनुमाने १२ किलोमीटरवर आणवा हे गाव आहे.
याच गावी भवानी आजूबाईचे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. आजूबाईची एक गावात आणि दुसरे गावाबाहेर अशी २ मंदिरे आहेत. गावातील आजूबाईचे मंदिर, म्हणजे देवीचे निवासस्थान होय. याच ठिकाणी देवीचा जन्म झाला होता. आज या ठिकाणी भव्य असा शेंदरी तांदळा आहे. गावाबाहेर अनुमाने एक किलोमीटर अंतरावर भवानी आजूबाईची स्वयंभू मूर्ती आहे. आज हीच आजूबाईची स्वयंभू मूर्ती मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे. देवीच्या मंदिरासमोर भव्य कुंड असून त्याला ‘कल्लोळी तीर्थ’ असे म्हणतात. या ठिकाणी स्नान केल्यास खरुज आणि त्वचेचे रोग बरे होतात; म्हणून असंख्य भाविक लोक स्नानासाठी येथे येतात.
मराठवाड्यात काही काळ निजामाची राजवट होती. त्या वेळी रझाकारांच्या कारवायांमुळे हिंदूंचा छळ आणि मंदिरांची नासधूस होत असे. अशाच एका प्रसंगात काही उपद्रवी लोकांनी देवी आजूबाईची मूर्ती नष्ट करण्याचा विचार केला. आक्रमणकर्ते मंदिराच्या गाभार्यापर्यंत येताच त्यांची त्या वेळी दृष्टीच गेली. प्रतिवर्षी येथे नवरात्रात चैत्र आणि आश्विन मासात देवीचा मोठा उत्सव होतो. नवरात्रात होमहवन इत्यादी कार्यक्रम होतात, तसेच ९ दिवस मोठी यात्रा भरते. चैत्र मासातील नवरात्रात देवीच्या जन्मपत्रिकेचे वाचन होते. अष्टमीला रात्री देवीची स्वारी निघते. त्या वेळी नवस करणारे लोक देवीभोवती मशाली पेटवून खेळतात. यालाच ‘देवीची पोत खेळणी’ म्हणतात. प्रतिवर्षी पोत खेळणार्यांची संख्या १ सहस्र ते १ सहस्र २०० असते. ‘आजूबाई जागृत देवस्थान असल्याने आई भवानी नवसाला पावते’, अशी अपार श्रद्धा भाविकांच्या अंतःकरणात आहे. येथे इतर धर्मांचे लोकही देवीला नवस करतात.’
(समाप्त)
– पां. पि. घरत
(साभार : ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक १९७५)