हिंदूंची धर्मशिक्षणाची आवश्यकता कोण पूर्ण करणार ?
‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात. हिंदूंमध्ये संघटनशक्ती आणि धर्माभिमान यांचा अभाव असल्याने काही राजकारणी अन् अंनिससारख्या पुरो(अधो)गामी म्हणवणार्या संघटना हिंदूंना ‘सर्वधर्मसमभावा’चे कारण सांगून वेळप्रसंगी त्यांना धर्माचरणापासून परावृत्त करतात. हिंदूंना धर्मशिक्षण कुणीच देत नाही. त्यामुळे काही हिंदूंकडून धार्मिक कृती करतांना जाणते-अजाणतेपणाने अयोग्य आचरण केले जाऊन श्रद्धास्थानांचा अवमान केला जातो. अशा स्थितीत सर्वच हिंदूंनी एकमेकांना धर्माचरणासाठी साहाय्य करणे, म्हणजे देवतांची कृपा प्राप्त करणे होय. या दृष्टीने मला लक्षात आलेली काही प्रातिनिधिक सूत्रे येथे देत आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये मी गणेशोत्सवाच्या काळात हरितालिका आणि श्री गणेशमूर्ती यांचे पूजन चाललेल्या काही ठिकाणी गेलो होतो. तेव्हा तेथे आढळलेली परिस्थिती पाहून ‘हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण मिळावे’, यासाठी सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा’, असे मला प्रकर्षाने वाटले.
१. हरितालिकामूर्ती पूजनाच्या ठिकाणी लक्षात आलेली दुःस्थिती !
अ. एके ठिकाणी सकाळी ११.३० वाजता १० महिला श्री हरितालिका पूजेसाठी उपस्थित होत्या. आणखी २-३ महिला पूजेसाठी येणार; म्हणून त्या महिला एकमेकांशी गप्पा मारत थांबल्या होत्या. त्या वेळी त्यांनी ‘देवतेला अपेक्षित अशी पूजा होण्यासाठी पूजासाहित्याची मांडणी योग्य प्रकारे करणे, स्तोत्रपठण किंवा नामजप करणे’, अशा कृती करून भक्तीभाव वाढवण्याचे प्रयत्न करायला हवे होते’, असे वाटले.
आ. बहुतांश महिला पूजा करतांना त्याकडे ‘एक वार्षिक पूजा उरकणे’, या दृष्टीने पहात असल्याचे मला आढळले. तेथील कुणाच्याही वागण्या-बोलण्यातून किंवा चेहर्याकडे पाहून हरितालिका देवींप्रती भक्तीभाव दिसत नव्हता.
इ. शेवटी पूजा सांगणार्या पुरोहितांना अनेक महिलांनी ‘दक्षिणा’ म्हणून १०-२० रुपये दिले. त्या वेळी त्या महिलांमध्ये देवींप्रतीचा भक्तीभाव आणि पुरोहितांप्रती कृतज्ञताभाव जाणवला नाही.
प्रत्यक्षात ‘प्रत्येक पूजेचे पूर्ण फळ मिळावे’, यासाठी पूजेच्या शेवटी पुरोहितांना महाविष्णूचे रूप मानावे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्राह्मणपूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत’, असे सांगितले आहे. त्या अंतर्गत पूजेच्या संकल्पामध्येच ‘श्रीमहाविष्णुस्वरूपिणे ब्राह्मणाय….’, असा उल्लेख केल्याचे आढळते; पण सध्या हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने अनेक जण पुरोहितांकडे ‘एक धंदेवाईक’ म्हणून पहातात. त्यामुळे ‘चरितार्थ चालवण्यासाठी आपण पुरोहितांना पुरेशी दक्षिणा द्यायला हवी’, हेही बहुतांश हिंदूंच्या लक्षात येत नाही.
२. श्री गणेशमूर्ती पूजनाच्या ठिकाणी आलेले अनुभव
अ. काही ठिकाणी पूजा करणारे पूजक हे पुरोहित घरी आल्यानंतरच श्री गणेशाची मूर्ती नियोजित ठिकाणी ठेवतात. मग पूजासाहित्य एकत्र करून त्याची मांडणी केली जाते. साहजिकच हे सर्व करतांना घाईगडबड होते.
(खरेतर पुरोहित घरी येण्याच्या काही वेळ अगोदर गणेशमूर्ती नियोजित स्थळी ठेवून शांतपणे पूजासाहित्याची मांडणी करायला हवी. त्यामुळे मनाला स्थिरता प्राप्त होऊन पूजेचा १०० टक्के लाभ होण्यास साहाय्य होते आणि पुरोहितांचाही वेळ वाया जात नाही. जर २-३ घरी पुरोहितांची प्रत्येकी १० मिनिटे वाया गेली, तर पुढील यजमानांचा तेवढा वेळ पुरोहितांची वाट पहाण्यामध्ये वाया जातो. – संकलक)
आ. एके ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीला सोंड लावून दोनऐवजी ४ हात लावलेली मूर्ती ‘गणेशमूर्ती’ म्हणून स्थानापन्न करण्यात आली होती.
(खरेतर धर्मशास्त्रानुसार श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजा करायला सांगितली आहे. स्वतःच्या मनाने वरीलप्रमाणे संत किंवा देवता यांना सोंड जोडून गणेशाचे रूप दिले, तर अशा मूर्तीच्या पूजनाचा पूजकाला अपेक्षित लाभ होत नाही; कारण अशा मूर्तीमध्ये संबंधित संत, देवता किंवा श्री गणेश यांचे तत्त्व अपेक्षित प्रमाणात येत नाही. खरेतर अशा मूर्तीतून नकळत देवता किंवा संत यांचे एकप्रकारे विडंबनच केले जाते. मग अशा मूर्तीची केलेली पूजा, प्रार्थना इत्यादींचे अपेक्षित फळ कसे मिळणार ? – संकलक)
इ. एका ठिकाणी अनेक युवकांनी गणेशाचे मानेपर्यंत किंवा केवळ सोंड रंगवलेले चित्र असणारे ‘टी-शर्ट’ परिधान केले होते.
(अशा प्रकारचे ‘टी-शर्ट’ परिधान केल्यास ते साबण आणि ‘ब्रश’ वापरून धुतांना ते चित्र निघून जाऊन ते अर्धवट असे रहाते. त्यातून नकळत देवतेचा अवमान होतो. अशा व्यक्तींवर देवतेची कृपा कधीतरी होईल का ? – संकलक)
३. श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी आलेला अनुभव
एका ठिकाणी अंनिस या तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनेच्या सूचनेनुसार काही हिंदूंनी ऐन पावसामध्ये नद्यांना पुरेसे पाणी असतांनाही कथित जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे बालदीभर पाण्यात किंवा कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केले.
(धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच गणेशमूर्तीचे विसर्जन करायला हवे. त्यामुळे गणेशमूर्तीतील चैतन्य आणि पवित्रके यांचा लाभ सर्वांना होतो. सनातन हिंदु धर्मात ऋषिमुनींनी प्रत्येक धार्मिक कृती सांगोपांग अभ्यास करूनच सांगितली आहे; पण ‘स्वतःला सर्वकाही कळते’, अशा आविर्भावात वरीलप्रमाणे धर्मशास्त्राशी विसंगत कृती केल्याने अशा हिंदूंना पापच लागते. आम्ही घरातील आणि शेजारच्या घरातील गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात भावपूर्ण विसर्जन केल्याने आम्हाला आनंदाची अनुभूती आली; पण त्या विसर्जनाचा ‘व्हिडिओ’ पाहिलेल्या अनेक जणांनी आवर्जून सांगितले की, तुम्ही पारंपरिक पद्धतीने गणेशाची भजने म्हणत किंवा जयघोष करत वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करतांनाचा व्हिडिओ पाहून मनाला आनंद वाटला. – संकलक)
वरील परिस्थिती मागील कारणांचा विचार करतांना लक्षात आले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण दिले जात नाही आणि अंनिस, पुरो(अधो)गामी इत्यादी विचारसरणीचे लोक हिंदु धर्मातील धार्मिक कृतींना विरोध करतात. सनातन हिंदु धर्मातील सर्वच कृती वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण अभ्यास करून सांगितल्या असल्या, तरी काही हिंदूंची देवता, धार्मिक कृती आणि धर्मशास्त्र यांवर श्रद्धा नसते. त्यामुळे अनेकांना हिंदु धर्मातील अनेक गोष्टी थोतांड वाटतात. परिणामी नैसर्गिक आपत्तींच्या काळात अश्रद्ध हिंदूंना देवतांचे साहाय्य मिळत नाही. यावर उपाय म्हणून सर्वच हिंदूंनी संघटित होऊन प्रत्येक हिंदूंना शालेय जीवनापासून धर्मशिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२३)