रामनाथी आश्रमात नवरात्रातील आठव्या दिवशी (३.१०.२०२२ या दिवशी) झालेल्या चंडीयागांतर्गत ‘देवी होमा’ च्या  वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर

१. त्रासदायक अनुभूती

‘यागाला जातांना मला उत्साह जाणवत होता. याग चालू झाल्यावर आरंभी मला चांगले वाटत होते. नंतर मला थकवा येऊ लागला. माझ्या अंगातील शक्ती गेल्यासारखे झाले.  पुरोहितांनी सर्वांना देवीचा बीजमंत्र वैखरीतून म्हणायला सांगितला. हा मंत्र मी काही वेळ म्हटला. त्यानंतर माझ्या अंगातील बळच गेल्यासारखे झाले. मी ओढून ताणून मंत्र म्हणत होते. शेवटी शेवटी तर मला तो म्हणायला जमतच नव्हते. माझे डोळे आपोआप बंद होत होते. नंतर मला ग्लानी येऊ लागली.

२. चांगल्या अनुभूती

२ अ. एका पोकळीत असल्याप्रमाणे जाणवून आनंद वाटणे : आज मी देवीच्या वस्त्राच्या रंगाचे, म्हणजे आकाशी रंगाचे कपडे परिधान केले होते. मला दिवसभर चांगले वाटत होते. दिवसभरात मधे मधे मी एका पोकळीत असल्याप्रमाणे मला जाणवले. माझा आनंद द्विगुणित झाला.

२ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सौ. सायली करंदीकर यांनी गीत म्हणणे : यागाच्या शेवटी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि त्यांची मुलगी सौ. सायली करंदीकर यांनी गीत गाण्यास आरंभ केला. तेव्हा मला पुढील सूत्रे जाणवली.

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सौ. सायली करंदीकर यांचे गाणे ऐकतांना याग चालू झाल्यानंतर मला झालेला त्रास आणि आलेली मरगळ जाऊन दैवी शक्ती मिळाली.

२. मला चंदनाचा सुगंध येत होता. अचानक वारा आला आणि ‘तो सुगंध वार्‍याने सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवले. मातेचा (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा) दैवी स्वर सुगंध होऊन जणू भूतलावर पसरत होता आणि त्या स्वररूपी सुगंधाचा स्वाद घेण्यास सर्व प्राणिमात्र आणि सृष्टी आतुरली होती. सुगंधाच्या स्वादाने माझे मन तृप्त झाले होते. ‘हा सुगंध असाच दरवळत रहावा’, असेच मला वाटत होते.

३. गायन ऐकत असतांना श्री सरस्वतीदेवीचे रूप डोळ्यांसमोर आले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू सरस्वतीदेवीप्रमाणे वाटत होत्या. तेव्हा देवीच (सरस्वतीदेवीरूपी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ) देवीची (म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची) स्तुती करत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी (सौ.) सिंगबाळ यांच्या मुखावर स्मितहास्य होते. त्या प्रसन्न मुद्रेने ते गीत ऐकत असतांना त्यांचा कंठ दाटून आल्याप्रमाणे जाणवत होते. ते दृश्य पुष्कळ सुंदर होते.

४. देवीच्या गीतगायनातून मला दैवी ऊर्जा मिळाल्यासारखी वाटली. त्या वेळी मला ‘गीतातून केलेली देवीची स्तुती सतत ऐकतच रहावी’, असे वाटत होते.

५. नंतर मला ताजेतवाने वाटू लागले. माझे मन प्रसन्न झाले होते. हळूहळू माझे मन एकाग्र आणि निर्विचार झाले.

देवीची दिव्यशक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि महर्षि यांच्या कृपेने अनुभवण्यास मिळाली, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२२)  

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.