प्रतापगड (सातारा) येथे मशाल महोत्सव उत्साहात साजरा !

सातारा, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड २० ऑक्टोबर या दिवशी ३६४ मशालींनी उजळून निघाला. प्रतापगडनिवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३६४ वर्षे पूर्ण झाल्याने नवरात्रोत्सवात षष्ठीच्या दिवशी ‘मशाल महोत्सव’ साजरा करण्यात आला. हा तेजोत्सव पहाण्यासाठी महाराष्ट्रातील सहस्रावधी शिवभक्त प्रतापगडावर उपस्थित होते.

२० ऑक्टोबर या दिवशी श्री भवानीमातेची विधीवत पूजा झाली. तदनंतर गोंधळ पार पडला. रात्री ८ वाजता ढोल- ताशांच्या गजरामध्ये, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा जयघोषामध्ये ३६४ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. श्री भवानीमाता मंदिरापासून धर्मध्वजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे संपूर्ण गड आणि परिसर उजळून निघाला होता. या वेळी प्रत्येक शिवभक्त ‘शिवकाळ’ अनुभवत होता.