जस्टिन ट्रुडोंचे हसे !
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने नुकतीच कॅनडावर केलेली राजनैतिक कारवाई पुष्कळ शेकली आहे, असे दिसते. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ४१ अधिकार्यांना भारताने घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे कॅनडाचा प्रथम तीळपापड झाला; मात्र गयावया करत त्याने बंद दाराआड आतंकवादी हरदीप निज्जर याच्या हत्येविषयी चर्चा करण्याची भूमिका स्वीकारली. भारताचा निर्णय पक्का असल्यामुळे त्याने निर्णयापासून तसूभरही माघार घेतली नाही आणि शेवटी या अधिकार्यांना भारत सोडावा लागला. यामुळे कॅनडाने भारतावर नव्याने आरोप केले आहेत, ‘भारत सरकारने नेहमीप्रमाणे भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांचे जगणे कठीण केले आहे. भारताने मुत्सद्देगिरीच्या मूलभूत तत्त्वांचेही उल्लंघन केले आहे.’ कॅनडा आता भारताकडे मूलभूत तत्त्वांचे ज्ञान पाजळत आहे. कॅनडाचा विचार करता त्याने कुठल्या मूलभूत तत्त्वांचे आतापर्यंत पालन केले आहे ? भारताने खलिस्तानी आतंकवाद्यांची सूची कॅनडाकडे दिली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूचीमधील अनेक खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये राजाश्रय उपभोगत आहेत. त्यांना भारताकडे सुपुर्द करण्याची मागणी भारताने केल्यावर त्याला ‘मूलभूत तत्त्व’ म्हणून सकारात्मक प्रतिसाद का दिला नाही ? येथे तर एक लोकशाही व्यवस्था असलेला मोठा देश आतंकवाद्यांची मागणी तेही ‘देशाचा मूलभूत हक्क’ म्हणून करत होता. खरेतर एवढ्या वर्षांमध्ये कॅनडाकडून गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करून भारताला आतंकवाद संपवण्यासाठी साहाय्य केले असते, तर त्याचे जगभर कौतुक झाले असते. कॅनडाने राजकीय सोयीसाठी ते केले नाही आणि आता तर तेथे काही सहस्र खलिस्तानी असतील, तर तेच एवढे डोईजड झाले आहेत की, कॅनडाने काय करावे ? आणि काय करू नये ? हे ते ठरवत आहेत.
बालीश ट्रुडो !
नुकतेच कॅनडाच्या संसदेत एका नाझी सैन्याधिकार्याचा गौरव करण्यात आला. तो ट्रुडो यांच्या सांगण्यानुसारच करण्यात आला. त्याविषयी इस्रायल आणि रशिया यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी तोंडदेखली क्षमा मागितली; मात्र संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांना त्यागपत्र द्यावे लागले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ग्रेग फर्गस यांच्या निवडीनंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांचे अभिनंदन करत संसदेमध्ये त्यांना डोळा मारला. त्यांना चूक झाल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी जीभ बाहेर काढली. त्यांच्या या हावभावांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पुष्कळ प्रमाणात प्रसारित झाल्यावर त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. ट्रुडो हे स्वत: मोठेपणाचा आव आणत असल्याचे दर्शवतात; मात्र त्यांच्या कृतीला राष्ट्रप्रमुख म्हणून प्रगल्भतेची झालर दिसून येत नाही.
इस्रायलचे सैन्य आणि हमासचे आतंकवादी यांच्यात सध्या मोठे युद्ध चालू आहे. कॅनडाने इस्रायलची बाजू घेतली आहे. ट्रुडो एका कार्यक्रमासाठी कॅनडामधील एका मशिदीमध्ये गेले होते. ते उपस्थितांना काही संबोधित करणार, तोच मुसलमानांनी ‘शेम’, ‘शेम’ अशा घोषणा दिल्या आणि ट्रुडो यांना संबोधनासाठी मज्जाव केला. त्यामुळे त्यांना लज्जास्पदपणे तेथून बाहेर पडावे लागले. त्यांच्या या वाईट स्थितीचाही व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
कॅनडातील विरोधी पक्षाचे नेते पिरे पॉईलव्हरे यांनी एका नेपाळी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले की, जस्टिन ट्रुडो हे असक्षम आणि अव्यावसायिक दृष्टीचे आहेत. त्यामुळे कॅनडामधील नागरिकांना त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे केलेलेच आहे आणि अन्य देशांशी संबंध बिघडवून घेतले आहेत. आम्हाला खरेतर जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताशी चांगले संबंध हवे आहेत. ट्रुडोंमुळेच कॅनडाची हानी झाली आहे. मी सत्तेवर आल्यावर संबंध चांगले करण्यावर भर देणार आहे.
आतंकवाद्यांचे सुरक्षित ठिकाण
कॅनडात आचार, वैचारिक स्वातंत्र्य, एखादी विचारप्रणाली प्रसारित करण्याचे स्वातंत्र्य पुष्कळ आहे. याचा अपलाभ अनेक कट्टरतावादी विचारसरणीचे समूह घेत आहेत. खलिस्तानी चळवळ भारतात आणि विदेशातही विशेष सक्रीय नव्हती; मात्र कॅनडात त्यांना राजाश्रय मिळाल्याने तिचे जाळे गत २० ते २५ वर्षांत घट्ट विणले गेले. खलिस्तानच्या वाढत असलेल्या प्रभावाखाली आणि कॅनडातील कुचकामी कायदे यांमुळे या आतंकवादाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ या विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी बाँबस्फोट घडवून भारतीय वंशाच्या ३२९ नागरिकांची हत्या केली. भारताचे विमान उडवून देणार्या आतंकवाद्यास पकडण्यासाठी १५ वर्षे लागली. त्याच्यावर खटला चालवून शिक्षा देण्यासही कॅनडामध्ये विशेष सक्रीयता नव्हती. त्याला शिक्षा झाली; मात्र वर्ष २००८ मध्ये त्याची सुटकाही झाली. एवढे मोठे आतंकवादी आक्रमण केल्यावर त्यातील केवळ एकच आतंकवादी अनेक वर्षांनी पकडला जातो आणि तोही सहजपणे सुटतो. यातून कॅनडाच्या लेखी भारतीय नागरिकांची काय किंमत आहे ? हे लक्षात येते. कॅनडाने बाँबस्फोटाकडे त्याच्या देशातील ‘आतंकवादी आक्रमण’ म्हणून न पहाता ‘भारतावरील आक्रमण’ म्हणून दुर्लक्ष केले आहे, हे स्पष्ट दिसते.
भारत गेली काही दशके आतंकवाद अनुभवत आहे. त्यामुळे भारताला त्याचे गांभीर्य आहे. कॅनडाला ‘खलिस्तानी आतंकवाद्यांची ओळख नाही’, असे वाटले, तरी भारताने त्याच्याकडे पुरावे दिले आहेत; मात्र स्वत:च्या राजकीय लाभासाठी खलिस्तानवाद्यांशी म्हणजेच आतंकवाद्यांशी सोयरीक साधून ‘कॅनडाचे पंतप्रधान दुसरे जर्नेल भिंद्रनवालेच पाळत आहेत’, हे खेदाने म्हणावे लागेल. कॅनडाच्या आतंकवादाविरुद्धच्या या मवाळ धोरणामुळे तोच यामध्ये जळेल कि काय ? याची भीती आहे. तूर्तास भारताने कॅनडाविरुद्ध आक्रमक पावले उचलत त्याचे गांभीर्य त्याला आणि जगाला लक्षात आणून देत रहावे !
कॅनडातील आतंकवादाविरुद्ध उचलत असलेल्या आक्रमक पावलांमुळे भारताचा जगात दबदबा होईल, हे निश्चित ! |