चंडीयागाच्या वेळी सप्तशती पाठातील श्लोक चालू असतांना वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) !
‘१४ आणि १५.५.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात चंडीयाग झाला. सनातन संस्थेचे काही संत आणि सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती या यागाला लाभली. सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) हेही या यागाला उपस्थित होते. यागाच्या वेळी पू. वामन पुष्कळ आनंदी होते. ते नेहमीप्रमाणे शांत आणि स्थिरपणे बसले होते. यागाला आरंभ झाल्यावर काही वेळाने पू. वामन यांनी वही आणि रंगीत पेन मागितले अन् चित्रे काढली. पू. वामन यांनी चंडीयागाचे चित्ररूपात केलेले सूक्ष्म परीक्षण आणि सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी चित्रांचा सांगितलेला विश्लेषणात्मक भावार्थ पुढे दिला आहे.
१. पू. वामन यांनी चंडीयागाचे चित्ररूपात केलेले सूक्ष्म परीक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना
१ अ. सप्तशती पाठाचा दुसरा अध्याय चालू असतांना काढलेल्या पहिल्या चित्राचे वर्णन
अ. पू. वामन यांनी केशरी रंगाने यज्ञकुंड काढले.
विश्लेषण : ‘यज्ञकुंडात सगुण-निर्गुण ईश्वरी शक्ती कार्यरत होती. त्यामुळे पू. वामन यांनी केशरी, म्हणजे भगव्या रंगाचे यज्ञकुंड काढले.’ – श्री. निषाद देशमुख
आ. त्यावर निळ्या रंगाने एक रेष काढली. ती रेष म्हणजे ‘नारायण’ असे पू. वामन यांनी सांगितले. (पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात. – संकलक)
इ. जांभळ्या रंगाने त्यावर २ मोठे स्वस्तिक काढले.
ई. डाव्या बाजूच्या स्वस्तिकाच्या मध्ये ॐ प्रमाणे दिसणारी २ चिन्हे काढली. ‘अन्य चिन्ह म्हणजे ‘नारायण’, असे पू. वामन यांनी सांगितले.
विश्लेषण : ‘स्वस्तिक हे सगुण स्तराच्या शक्तीशी संबंधित आहे. यज्ञातून प्रथम सगुण आणि त्यानंतर निर्गुण स्तराची शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यामुळे पू. वामन यांनी प्रथम दोन स्वस्तिक आणि त्यानंतर डाव्या बाजूच्या स्वस्तिकामध्ये ‘ॐ’ सारखी २ चिन्हे काढली.’ – श्री. निषाद देशमुख
उ. पू. वामन यांनी कागदावर निळ्या रंगाने काही आकार काढले. ती प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) खोली झाली.
विश्लेषण : ‘यज्ञाच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर आलेले महामृत्यूयोगाचे संकट दूर करणे’, असेही होते. त्यामुळे ‘ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीवरही यज्ञातील शक्तीचा परिणाम होत आहे’, हे पू. वामन यांनी चित्रातून दाखवले.’ – श्री. निषाद देशमुख
ऊ. यज्ञस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काही वेळ येऊन गेल्यावर पू. वामन यांनी चित्रात केशरी रंगाचा ध्वज काढला आणि त्यानंतर ‘आता झाले’, असे ते म्हणाले.
विश्लेषण : ‘ध्वज’ हे विजयाचे प्रतीक असते. स्वास्थ्य ठीक नसतांनाही अत्यंत प्रतिकूल स्थितीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यज्ञस्थळी आले. त्यामुळे निर्गुण स्तरावरील वाईट शक्तींचा पराभव होऊन यज्ञाचा समष्टी उद्देश, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी बळ देणे, हा सफल झाला. ‘हा एक प्रकारे धर्माचा विजय आहे’, हे दाखवण्यासाठी पू. वामन यांनी केशरी रंगाचा ध्वज काढला.’ – श्री. निषाद देशमुख
ए. इतर वेळी यागामध्ये अनिष्ट शक्तींची आक्रमणे किंवा त्रास असल्यास पू. वामन चित्रांत काळा रंग वापरतात; परंतु या वेळी त्यांनी एकदाही काळा रंग वापरला नाही. त्यांनी काळ्या रंगाचे पेन हातातही घेतले नाही. याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आज काळ्या रंगाची आवश्यकता नाही.’’
विश्लेषण : ‘प्रत्यक्षातही पूर्ण यज्ञात कधीच दाब जाणवला नाही. या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ म्हणाले, ‘‘यज्ञाच्या आरंभी ४ – ५ टक्के दाब होता; पण तो नगण्य असल्याने यज्ञ चालू होताच नष्ट झाला.’’ यातून पू. वामन यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता लक्षात येते.’ – श्री. निषाद देशमुख
१ आ. सप्तशती पाठाच्या तिसर्या अध्यायाच्या वेळी काढलेले सुदर्शनचक्र आणि त्यातील सप्तरंग यांचे वर्णन
अ. यागाकडे पहात चित्र काढून पू. वामन म्हणाले, ‘‘हे ब्रह्मांडात फिरणारे सुदर्शनचक्र आहे.’’
आ. त्यांनी सुदर्शन चक्रावर लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी आणि केशरी अशा वेगवेगळ्या रंगांनी वर्तुळे काढली.
इ. मी पू. वामन यांना विचारले, ‘‘सुदर्शनचक्र पिवळे असते. या चित्रात हे सर्व रंग कसे आहेत ?’’ यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हे सर्व रंग त्यात असतात; पण आपल्याला ते दिसत नाहीत. सगळे देवबाप्पा असतात ना !’’
विश्लेषण : ‘सुदर्शनचक्र म्हणजे श्रीविष्णूची क्रियाशक्ती ! ‘ज्ञानशक्तीतून क्रियाशक्ती आणि क्रियाशक्तीतून इच्छाशक्ती निर्माण होऊन ती सर्व कार्य करते’, असे शास्त्र आहे. यज्ञाद्वारेही क्रियाशक्ती, म्हणजे चैतन्य प्रक्षेपित होऊन साधकांना इच्छाशक्ती, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा विविध कार्यांसाठी बळ मिळत होते. हीच प्रक्रिया पू. वामन यांनी चित्रातून दाखवली.’ – श्री. निषाद देशमुख
२. चंडीयागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी पू. वामन शांतपणे आसंदीवर बसून रहाणे आणि नंतर त्यांना ध्यान लागणे
१५.५.२०२३ या दिवशी चंडीयागाची पूर्णाहुती होती. पू. वामन यांना पूर्णाहुती बघायला पुष्कळ आवडते. संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत याग चालू होता आणि पू. वामन आसंदीवर अगदी शांतपणे बसले होते. याग चालू झाल्यावर पाचव्या अध्यायापासून ते नवव्या अध्यायापर्यंत बसलेल्या स्थितीतच ते झोपी गेले. त्या वेळी ‘ते ध्यानावस्थेत आहेत’, असे मला जाणवत होते. प्रत्यक्षात पू. वामन यांची ही झोपण्याची वेळ नव्हती. ते उठल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘झोप झाली का ?’’ तेव्हा ते स्पष्टपणे म्हणाले, ‘‘मी झोपलो नव्हतो.’’ त्यांचा चेहराही झोपून उठल्याप्रमाणे दिसत नव्हता.
(प्रश्न – सौ. मानसी राजंदेकर : ‘पू. वामन ध्यानावस्थेत होते’, असे मला जाणवले. ते योग्य आहे का ? उत्तर – हो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले)
३. पू. वामन यांनी काढलेले कमळाचे चित्र
श्री. विनायक शानभाग चंडीयागाची आणि तिन्ही गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) महती सांगत असतांना पू. वामन यांनी कमळाचे चित्र काढले.
अ. पू. वामन यांनी आधी कागदावर हिरव्या रंगाने एक आकार काढला. त्यात बरेच रकाने केले आणि स्वस्तिक काढले.
विश्लेषण : ‘हिरव्या रंगात काढलेली आकृती म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम.’ – श्री. निषाद देशमुख
आ. त्यावर गुलाबी रंगाने फुलांप्रमाणे दिसणार्या पाकळ्या असलेली आकृती काढली.
विश्लेषण : ‘काही ठराविक उच्च लोक (शक्तीकेंद्रे) सूक्ष्मातून कमळाच्या फुलाप्रमाणे दिसतात.’ – श्री. निषाद देशमुख
इ. हिरव्या आकृतीच्या खाली शेवटी परत गुलाबी रंगाने पायर्यांप्रमाणे काढले.
विश्लेषण : ‘या पायर्या सूक्ष्म आध्यात्मिक मार्गाच्या प्रतीक आहे. समाजात साधना करणार्यांना साधनेचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी देव या मार्गातून त्यांना आश्रमात आणतो.’ – श्री. निषाद देशमुख
ई. त्याभोवती लाल रंगाचे कवच काढले. ‘ते शक्तीचे कवच आहे’, असे पू. वामन म्हणाले.
उ. त्यात पिवळ्या रंगाचे चैतन्य असून निळ्या रंगाचे शेषनाग आहेत.
ऊ. या चित्राचा अर्थ सांगतांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे गुलाबी रंगाचे कमळ ब्रह्मांडात आहे; पण रामनाथी आश्रमात ते हिरव्या रंगात उमलले आहे; कारण इथे नारायण आहेत. कमळाची गुलाबी रंगातील प्रीती सर्वांपर्यंत जात आहे.’’
विश्लेषण : ‘समष्टी साधना करणारे संत आणि साधक यांच्या साधनेमुळे रामनाथी आश्रमातील वातावरण काही प्रमाणात ब्रह्मांडातील उच्च लोकांप्रमाणे झाले आहे’, असे पू. वामन यांनी चित्रातून दाखवले.’ – श्री. निषाद देशमुख
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई, आताची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे) फोंडा, गोवा. (१९.५.२०२३)
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |