चिपळूण येथील वाशिष्ठी पुलाला भेग पडलेली नसून तो प्रसारण सांधा !
सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या ‘व्हिडिओ’विषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाचा खुलासा
चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी पुलाच्या खालच्या बाजूने भेग पडली असल्याचा एक ‘व्हिडिओ’ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. त्याविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे. या खुलाशामध्ये ‘पुलाला भेग पडलेली नसून तो प्रसारण सांधा आहे.’, हे स्पष्ट केले आहे, असे वृत्त ‘कोकणटुडे’ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परशुराम घाट ते आरवली या अंतरामध्ये चिपळूण टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम परशुराम-आरवली हायवेज प्रा.लि. या ठेकेदारामार्फत प्रगतीत आहे. वाशिष्ठी नदीवरील पुलाचे उर्वरित कामही या ठेकेदारामार्फत करण्यात आले; मात्र काही दिवसांपासून वाशिष्ठी पुलाच्या संदर्भात ‘व्हिडिओ’ प्रसारमाध्यमांवर प्रसारित होतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या पुलाच्या ‘डेस्क स्लॅब’च्या खालच्या भागाला भेग गेल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या भागात भेग गेलेली नाही. तो प्रसारण सांधा आहे.