सांकवाळ येथील ‘आरिश बेकरी’च्या ब्रेडमध्ये सापडल्या उंदराच्या लेंड्या
‘बेकरी’ला अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस पाठवली
पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – सांकवाळ येथील ‘आरिश बेकरी’कडून बनवल्या जाणार्या ‘जेसिया सँडवीच ब्रेड’या नावाने सिद्ध केलेल्या उत्पादनात लोटली येथील एका ग्राहकाला चक्क उंदराच्या लेंड्या सापडल्या. यासंबंधी ग्राहकाने ‘गोवा कॅन’ या संस्थेशी संपर्क साधला. ‘गोवा कॅन’ने नंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षिण गोवा कार्यालयात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे दक्षिण गोव्याचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी त्वरित ‘आरिश बेकरी’ला उंदीर आणि इतर कीटकांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ प्रक्रिया करण्याचा आदेश दिला. ही प्रक्रिया होईपर्यंत ब्रेडचे उत्पादन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अधिकारी रिचर्ड नोरोन्हा पुढे म्हणाले, ‘‘अन्न आणि औषध प्रशासन कायद्याच्या कलम ३२ खाली ‘आरिश बेकरी’च्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे आणि यासंबंधी अन्वेषण चालू आहे’’.
ग्राहकांच्या अधिकाराविषयी ‘गोवा कॅन’कडून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जागृती
‘गोवा कॅन’ या अशासकीय संस्थेने ग्राहकांच्या अधिकाराविषयी शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जागृती अभियान आरंभले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्राहकांचे अधिकार कोणते आहेत ? अधिकारांची पायमल्ली झाल्यास कुणाकडे दाद मागायची ? यांविषयी जागृती करण्यात येत आहे. |