‘दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांवर होणारा सकारात्मक परिणाम’ याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

२४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘विजयादशमी’ आहे. त्या निमित्ताने..

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आश्विन शुक्ल दशमी, म्हणजे ‘दसरा’ ! हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्‍याला आपट्याची पाने देण्याला विशेष महत्त्व आहे. वर्ष २०१८ मध्ये (कै.) परात्पर गुरु पांडे महाराज यांनी आणि सनातनच्या एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दसर्‍यानिमित्त आपट्याचे पान दिले होते. ‘आपट्याच्या पानावर दसर्‍याच्या दिवशी काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत परात्पर गुरु पांडे महाराज आणि एक साधक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दसर्‍यानिमित्त दिलेले आपट्याचे पान अन् तुलनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या लागवडीतील आपट्याचे पान यांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१ अ. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या तीनही पानांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : चाचणीतील आपट्याच्या तीनही पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या आपट्याच्या पानांमध्ये दसर्‍याच्या आदल्या दिवशीही सकारात्मक ऊर्जा होती. दसर्‍याच्या दिवशी तीनही पानांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानात सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

२. निष्कर्ष

आपट्याच्या पानांमध्ये मुळातच सकारात्मक स्पंदने असून दसर्‍याच्या दिवशी त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होते.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

३ अ. चाचणीतील आपट्याच्या तीनही पानांमध्ये दसर्‍याच्या आदल्या दिवशीही सकारात्मक ऊर्जा असण्यामागील कारण : ‘अन्य वृक्षांच्या तुलनेत आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांच्यातील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)

चाचणीतील तीनही आपट्याच्या पानांमध्ये तेजतत्त्व (चैतन्य) असल्याने दसर्‍याच्या आदल्या दिवशीही त्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. दसर्‍याच्या आदल्या दिवशी साधकाने दिलेल्या आपट्याच्या पानापेक्षा आश्रमाच्या लागवडीतील आपट्याच्या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्यामागील कारण : सनातन संस्थेच्या आश्रमात संत आणि साधक यांचे असणारे वास्तव्य, त्यांची दैनंदिन साधना अन् अविरतपणे चालणारे राष्ट्र-धर्माशी संबंधित अतुलनीय कार्य यांमुळे सनातनचा आश्रम अन् आश्रम परिसर यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता (चैतन्य) आहे. याचा सकारात्मक परिणाम तेथील व्यक्ती, वनस्पती, वस्तू यांवर होतो. आश्रमाच्या लागवडीतील आपट्याच्या पानावर तेथील चैतन्याचा चांगला परिणाम झालेला आहे. त्यामुळे साधकाने दिलेल्या पानापेक्षा आश्रमाच्या लागवडीतील आपट्याच्या पानामध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. यातून ‘सात्त्विक वातावरणाचा वनस्पतींवर चांगला परिणाम होतो’, हे लक्षात येते.

सौ. मधुरा कर्वे

३ इ. दसर्‍याच्या आदल्या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असण्यामागील कारण : परात्पर गुरु पांडे महाराज हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा देह, त्यांच्या सभोवतालचे वातावरण, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती इत्यादींवर होतो. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या पानाला त्यांचा चैतन्यमय हस्तस्पर्श झाल्याने त्या पानाची सात्त्विकता पुष्कळ वाढली. त्यामुळे दसर्‍याच्या आदल्या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानामध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. यातून ‘संतांमधील चैतन्याचा वनस्पतींवर केवढा सकारात्मक परिणाम होतो’, हे लक्षात येते.

३ ई. दसर्‍याच्या दिवशी चाचणीतील आपट्याच्या तीनही पानांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होण्यामागील कारण : आश्विन शुक्ल दशमी, म्हणजे दसर्‍याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांमधील तेजतत्त्व अधिक प्रमाणात जागृत होत असल्याने त्या दिवशी आपट्याची पाने देण्याला विशेष महत्त्व आहे. चाचणीतील आपट्याच्या तीनही पानांमधील तेजतत्त्व दसर्‍याच्या दिवशी अधिक प्रमाणात जागृत झाल्याने त्या पानांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली. यातून ‘हिंदु धर्मात विशिष्ट तिथीला विशिष्ट सण साजरे करण्यामागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते.

३ उ. दसर्‍याच्या दिवशी आश्रमाच्या लागवडीतील आपट्याच्या पानाच्या तुलनेत साधकाने दिलेल्या आपट्याच्या पानात अधिक सकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! साधकासाठी गुरु हेच त्याचे सर्वस्व असतात. साधकाचा गुरूंप्रती भाव असतो. त्यामुळे गुरूंनी सांगितलेली साधना तो तळमळीने करतो. दसर्‍यानिमित्त साधकाने कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपट्याचे पान दिले होते. चाचणीतील अन्य पानांप्रमाणे साधकाने दिलेल्या आपट्याच्या पानामध्येही दसर्‍याच्या दिवशी अधिक प्रमाणात तेजतत्त्व जागृत झाले. त्याच्या गुरूंप्रती असलेल्या भावामुळे त्या पानातील चैतन्यात अजून वाढ झाली. त्यामुळे लागवडीतील पानाच्या तुलनेत साधकाने दिलेल्या आपट्याच्या पानात अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. यातून साधकांमध्ये गुरूंप्रती भाव असण्याचे महत्त्व लक्षात येते.

३ ऊ. दसर्‍याच्या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा आहे, तरीही ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानतात. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव आहे. त्यांनी दसर्‍यानिमित्त कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉक्टरांना आपट्याचे पान दिले होते. या पानामध्ये मुळातच (म्हणजे दसर्‍याच्या आदल्या दिवशीही) पुष्कळ सात्त्विकता होती. हे पान शिष्यभावातील ‘परात्पर गुरु’ पदावरील संतांनी (परात्पर गुरु पांडे महाराज यांनी) कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉक्टरांना दिले असल्याने दसर्‍याच्या दिवशी त्या पानातील तेजतत्त्वात (चैतन्यात) पुष्कळ वाढ झाली. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे , महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.८.२०१९)

इ-मेल : mav.research2014@gmail.com