स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्रद्धांजली

हवेत बंदुकीच्या ३ फैरी झाडून देशभरातील हुतात्मा पोलिसांना अभिवादन

रत्नागिरी – देशभरात कर्तव्य बजावतांना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. हवेत बंदुकीच्या ३ फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून पोलीस दलाकडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकार्‍यांना आणि अंमलदारांना कर्तव्य बजावत असतांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस येथील पोलीस कवायत मैदानातील स्मृतीस्तंभास पालकमंत्री उदय सामंत, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उपअधीक्षक नीलेश माईनकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

पालकमंत्री सामंत यांनी या वेळी श्रद्धांजली संदेशाचे वाचन केले.

लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी आक्रमण केले. या आक्रमणात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून सीमेचे संरक्षण करतांना प्राण गमावला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारतामध्ये एकूण १८८ पोलीस अधिकारी आणि सैनिक यांनी हौतात्म्य पत्करले.