राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंदवा !
चिपळूण येथील उड्डाणपूल दुर्घटनेच्या प्रकरणी प्रांत कार्यालयातील बैठकीत मागणी
चिपळूण – बहादूरशेखनाका येथील उड्डाणपूल कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार आस्थापन यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यापुढील कालावधीत पुलाच्या कामकाजाच्या वेळी आपत्तीच्या घटना घडू नयेत, तसेच बहादूरशेख नाका परिसरातील लोकांना कोणतीही इजा पोचू नये, यासाठी या दुर्घटनेविषयी येथील प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, ठेकेदार आस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उड्डाणपूल आणि महामार्गाच्या पुढील कामकाजाची रूपरेषा ठरवण्यात आली. नियुक्त केलेल्या समितीने उड्डाणपुलाची पहाणी केल्यानंतर त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उड्डाणपूल आणि महामार्ग चौपदरीकरण कामासंदर्भात संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचीही मागणी करण्यात आली.
या वेळी माजी सभापती शौकत मुकादम यांनी पुलाला वापरण्यात आलेल्या स्टील आणि सिमेंट, त्याचसमवेत निकृष्ट कामाच्या ज्या ठिकाणी तक्रारी आहेत, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. वरिष्ठ पातळीवरच्या तज्ञांना बोलावून आम्हाला घडलेल्या दुर्घटनेची वस्तूस्थिती आणि पुढील कामकाजाची माहिती द्यावी, अशीही मागणी या वेळी संबंधित अधिकार्यांकडे करण्यात आली.