आम्ही गाझामध्ये हमासवर ३ टप्प्यांत कारवाई करून त्याला नष्ट करू ! – इस्रायल
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी सांगितले की, आम्ही सर्वप्रथम हमासची सैनिकी क्षमता आणि सरकार चालवण्याची क्षमता नष्ट करू. दुसर्या शब्दांत, आम्ही हमासला उखडून टाकू. यानंतर गाझामध्ये नवीन सुरक्षाव्यवस्था निर्माण केली जाईल. युद्ध ३ टप्प्यांत होईल. आम्ही पहिल्या टप्प्यात आहोत. यामध्ये आम्ही हवाई आक्रमणांद्वारे हमासचे तळ उद्ध्वस्त करत आहोत. लवकरच भूमीवर आक्रमण करणार आहोत. यात हमासच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट करण्यात येतील. दुसर्या टप्प्यात सैनिक लहानमोठ्या कारवाया चालू ठेवतील आणि हमासच्या गुप्तहेरांना ठार करतील. यानंतर तिसर्या टप्प्यात गाझामध्ये नवीन सुरक्षायंत्रणा निर्माण करू. यामध्ये इस्रायलची कोणतीही भूमिका असणार नाही.
येमेनच्या हुती बंडखोरांकडूनही इस्रायलवर आक्रमण
इस्रायलने गाझा शहरातील अल-कुद्स रुग्णालय रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. हे रुग्णालय आणि त्याच्या परिसरात सहस्रावधी लोक उपस्थित आहेत. रुग्णालय प्रशासनाने ते रिकामे करण्यास नकार दिला आहे. इस्रायलच्या आक्रमणांमुळे बेघर झालेले सुमारे १२ सहस्र लोक येथे रहात आहेत. दुसरीकडे हमास आणि हिजबुल्ला यांच्यानंतर येमेनच्या हुती बंडखोरांनीही इस्रायलवर आक्रमण करण्यास चालू केले आहे. युद्ध थांबवण्यासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या नेतृत्वाखाली एक परिषद आयोजित केली जात आहे; मात्र या परिषदेत हमास आणि इस्रायल यांच्या कोणत्याही प्रतिनिधीचा समावेश नाही.
हमासकडून २ अमेरिकी ओलिसांची सुटका
कतारच्या मध्यस्थीनंतर आतंकवादी संघटना हमासने २० ऑक्टोबरच्या रात्री २ अमेरिकी नागरिकांची सुटका केली. हे दोघे म्हणजे एक महिला आणि तिची मुलगी असे आहेत. हमासने दोघांना रेडक्रॉसकडे सुपुर्द केले. त्यानंतर रेडक्रॉसने त्यांना इस्रायलकडे सुपुर्द केले. हमासच्या कह्यातून मुक्त झाल्यानंतर ज्युडिथ आणि नताली यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.
साहाय्य सामग्री गाझामध्ये पोचली नाही !
गाझा आणि इजिप्त यांच्या सीमेवरील रफाह भागातून सीमा ओलांडून साहाय्य सामग्री असलेले ट्रक गाझामध्ये जाऊ शकलेले नाहीत. यावर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सीमेवर या ट्रकची पडताळणी कोण करणार ?’, हे अद्याप ठरलेले नाही. अमेरिका आणि इस्रायल यांची अट आहे की, साहाय्य सामग्री पाठवण्यापूर्वी ती हमासच्या कह्यात जाणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.
It’s impossible to be at the Rafah crossing & not feel heartbroken.
Behind these walls there are 2 million people in Gaza with no water, food, medicine, fuel.
On this side, these trucks have what they need.
We need to make them move—as soon as possible, as many as necessary. pic.twitter.com/GaogVeKtsl
— António Guterres (@antonioguterres) October 20, 2023