(म्हणे) ‘एल्गार’ला नक्षलवादी आणि माओवादी यांनी निधी पुरवल्याचा पोलिसांचा आरोप खोटा ! – प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकर यांची गरळओक !

प्रकाश आंबेडकर

पुणे – एल्गार परिषदेला नक्षलवादी आणि माओवादी यांनी निधी पुरवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हा आरोप धादांत खोटा असून आरोप करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची मला उलटतपासणी घेऊ द्यावी. त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना पुन्हा आयोगासमोर पाचारण करावे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सांगितले. २० ऑक्टोबरला एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांची उलटतपासणी झाली.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ या दिवशी दंगल झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमीत मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलटतपासणी घेण्यात येत आहे. विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य यांची साक्ष आणि उलटतपासणी घेण्यात येत आहे. अधिवक्ता बी.जी. बनसोडे आणि अधिवक्ता किरण चन्ने यांनी अधिवक्ता आंबेडकर यांची उलटतपासणी घेतली, तर आयोगाच्या वतीने अधिवक्ता आशिष सातपुते कामकाज पहात आहेत.