प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट
रामनाथी (गोवा)- भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा परिचयजगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी वर्ष १९७६ मध्ये इंदूरचे थोर संत नाना महाराज तराणेकर यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या आज्ञेने श्री. शेवडे यांनी शाळेतील मुख्याध्यापकपदाच्या नोकरीचे त्यागपत्र देऊन धर्मप्रसाराच्या कार्यास वाहून घेतले. जगभरात १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने घेतली आहेत. त्यांनी अमेरिकेत ५५० प्रवचने घेतली आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये म्हणजे तेथील संसदेला त्यांनी संबोधित करतांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांविषयी गेली अनेक दशके होणारा अपप्रचार श्री. सु.ग. शेवडे यांनी त्यांच्या ‘संभाजी’ या पुस्तकातून पुराव्यानिशी खोडून काढला. यामुळे पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा होणारा अपप्रचार थांबला. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशीही त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक वेळा प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे हे भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे पुत्र, तर आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे हे नातू आहेत. |
सनातन संस्थेकडून भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा सन्मान !
भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी त्यांनी साधकांना त्यांच्या ओघवत्या वाणीत मार्गदर्शन केले. या वेळी श्री. शेवडे यांनी त्यांचे गुरु संत नाना महाराज तराणेकर यांच्याकडे येणार्या प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी झालेल्या जवळिकीविषयीही उल्लेख केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात हिंदु धर्म आणि वेद यांची महानता अवगत केली. मनुष्याच्या सुखी जीवनासाठी ज्योतिषशास्त्राच्या आवश्यकतेविषयी त्यांनी दाखले दिले.
‘सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे, जी श्रद्धेने ज्ञान निर्माण करते. संस्थेत ‘श्रद्धा’ हा पाया आहे’, असे भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी आवर्जून सांगितले.
‘सनातन प्रभात’चे कार्य पुष्कळ मोठे ! – भारताचार्य सु.ग. शेवडेसनातनच्या आश्रमातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा करणार्या साधकांशी संवाद साधतांना ‘सनातन प्रभातचे कार्य पुष्कळ मोठे असून तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला माझा नमस्कार’, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. |
भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
१. डॉ. आठवले यांच्याशी फार पूर्वी भेट झाली, तेव्हा ‘ही व्यक्ती पुढे मोठे काम करील’, हे माझ्या लक्षात आले होते आणि आता ते खरे झालेले पहायला मिळाले. एवढे मोठे स्थान (सनातनचा आश्रम) निर्माण केले, ‘साधना करून ईश्वरप्राप्ती करणे’ हा मंत्र मानून त्यानुसार लोकाभिमुख, जगाच्या कल्याणाचे कार्य निःस्वार्थीपणे येथे चालू आहे.
२. प.पू. डॉ. आठवले हे उत्तम शिष्य आहेत. ज्ञानलालसा असलेला शिष्य मिळेल तिथून ज्ञान घेत असतो. तसे प.पू. डॉक्टर यांनी मिळेल तिथून ज्ञान घेतले आणि आज ते ज्ञानाच्या वेगळ्या उंचीवर पोचले आहेत. ज्ञानाच्या आधारे ते करत असलेले कार्य या पृथ्वीवर अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही; म्हणून मला तुमचा (सनातनच्या साधकांचा) हेवा वाटतो. माझे वय वाढले असल्याचे मला दुःख वाटते, अन्यथा मीपण तुमच्यासारखा या कार्यात सहभागी झालो असतो. तुम्ही (सनातनचे साधक) पुण्यवान आहात; म्हणून इथे (सनातनच्या आश्रमात) आलात.
३. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या शिष्यांवर स्वतःची आवड न लादता शिष्यांना रूची असलेल्या क्षेत्रात मुबलक सेवा उपलब्ध करून दिली आहे. भगवद्प्राप्तीसाठीच्या ज्ञानलालसेतून ज्ञान मिळवणे, सेवा करणे आणि तेही भगवद्चिंतनासह ! ही दुर्लभ गोष्ट येथे (सनातन आश्रमात) चालू आहे.