रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या सरस्वतीदेवीच्या ‘हंसवाहिनी यागा’च्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २९.७.२०२२ या कालावधीत श्री सरस्वतीदेवीचा ‘हंसवाहिनी याग’ झाला. त्या वेळी मी रामनाथी आश्रमात होते. मला पहिल्या दिवशी या यागाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. वातावरणात श्री सरस्वतीदेवीचे निर्गुण तत्त्व कार्यरत असल्याचे पुरोहितांनी सांगितल्यावर त्याची अनुभूती येणे आणि सूक्ष्मातून सरस्वतीलोकात गेल्यावर श्री सरस्वतीदेवीचे दर्शन होणे
‘वातावरणात श्री. सरस्वतीदेवीचे निर्गुण तत्त्व कार्यरत असून त्याची साधकांनी अनुभूती घ्यायची आहे’, असे पुरोहितांनी सांगितले. त्या वेळी मला ‘यज्ञाच्या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात निर्गुण तत्त्व कार्यरत आहे’, असे जाणवले.
‘आपण सरस्वती लोकात जाऊया’, असा माझ्या मनात विचार आला. तेव्हा पुढील दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आले. ‘श्वेत वर्णाची अनेक कमळे असलेले एक सरोवर आहे. तिथे संपूर्ण पांढरा प्रकाश पसरलेला आहे. श्री सरस्वतीदेवी एका मोठ्या श्वेत कमलपुष्पावर विराजमान आहे. माझा ‘श्री सरस्वतीदेव्यै नमः ।’ हा नामजप चालू आहे. श्री सरस्वतीदेवीच्या समवेत असलेल्या तिच्या सेविका तिच्यासारख्याच दिसत असून त्या छोट्या छोट्या कमलपुष्पांवर विराजमान आहेत. त्या ठिकाणी मला ब्रह्मदेवाचेही निर्गुण स्तरावरील अस्तित्व जाणवले.’ तेव्हा मला निर्गुणाची स्थिती अनुभवता येत होती.
२. यागात अर्पण केलेल्या आहुतीचा दीर्घ श्वास घेऊन सुगंध घेतल्यावर आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
काही वेळाने ‘आता आपण जी आहुती यागात अर्पण करणार आहोत, तिचा दीर्घ श्वास घेऊन सुगंध घेतल्यास आपली प्राणशक्ती वाढणार आहे’, असे पुरोहितांनी सांगितले. त्या वेळी मी मन एकाग्र करून तो सुगंध अनुभवण्याचा प्रयत्न केला. मी दोन वेळा दीर्घ श्वास घेतला; परंतु मला मोठ्या प्रमाणात दुर्गंध आला आणि तिसर्या दीर्घ श्वासाच्या वेळेला मला सुगंधाची अनुभूती घेता आली.
त्यानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘हा याग आपण हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी करत आहोत. हे देव आणि असुर यांमधील युद्ध आहे. श्री सरस्वतीदेवी प्रसन्न व्हावी, यासाठी आपण हा याग करत आहोत. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होणार आहे, म्हणजे वायुतत्त्वाच्या माध्यमातून श्री सरस्वतीचे तत्त्व संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित होऊन साधक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या विचाराने प्रेरित होणार आहेत. त्यांच्या मनात ते बीज रोवले जाऊन आणि त्यांच्यात ब्राह्मतेजाची निर्मिती होऊन पुढे ते संघटित होऊन सात्त्विक हिंदु राष्ट्रासाठी गतीने कृतीशील होणार आहेत; परंतु हे अनिष्ट शक्तींना नको आहे. त्यामुळे ‘यामध्ये अडथळा कसा आणायचा, तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’चा सात्त्विक विचार वायुमंडलात प्रक्षेपित होऊ नये आणि तो नष्ट व्हावा’, या विचारांनी प्रेरित होऊन सर्व अनिष्ट शक्ती एकत्रित आल्या आहेत. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरवून विचाररूपी श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व असलेला सुगंधी वायू नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘हा विचार ब्रह्मांडात प्रक्षेपित होऊ नये आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात अडथळा यावा’, या हेतूने त्या कसोशीने प्रयत्न करत आहेत.’
३. यागात अत्तराची दुसरी आहुती अर्पण केल्यावर वातावरणात पुष्कळ सुगंध प्रक्षेपित होणे
अ. त्या वेळी मला ‘त्या अनिष्ट शक्तींचा पराभव झालेला आहे’, असे जाणवले.
आ. तेव्हा मलाही हलके वाटून नामजप अधिकच एकाग्रतेने होऊ लागला.
इ. यज्ञाच्या वेळी मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सगुण रूपातील सरस्वती असून त्या निर्गुण रूपातील श्री सरस्वतीदेवीचे पूजन करत आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.
ई. ‘हा यज्ञ सरस्वतीलोकात चालू असून यागाची भूमी अधिकच प्रकाशमान झाली आहे’, असे मला वाटले.
उ. त्यानंतर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ध्यानावस्थेत आहेत’, असे मला वाटले.
४. अनुभूती
हे लिखाण करतांना मला जाणवले, ‘श्री सरस्वतीदेवीनेच हे सर्व करून घेतले आहे. तीच माझे बोट धरून हे लिहून घेत आहे. एक शब्द लिहिल्यावर पुढचा शब्द आपोआपच माझ्या मनात उमटून तसे लिखाण होत आहे.’
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला हे सर्व अनुभवता आले, याविषयी श्री सरस्वतीदेवी आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वय ५१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सनातन सेवाकेंद्र, ठाणे. (२५.७.२०२२)
तीर्थक्षेत्रासम सात्त्विकता आणि चैतन्य असलेल्या सनातनच्या रामनाथी आश्रमात याग झाल्यामुळे त्यातून साधकांना आध्यात्मिकदृष्ट्या विविध लाभ होणे‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री सरस्वतीदेवीचा ‘हंसवाहिनी याग’ झाला. या ‘हंसवाहिनी यागा’ला उपस्थित असलेल्या साधकांना विविध अनुभूती आल्या. काही साधकांना ज्ञान प्राप्ती झाली, तर काहींना नवनवीन विचार सुचण्याचे प्रमाण वाढले. साधकांची भावावस्था वृद्धींगत होण्याचे प्रमाणही अधिक होते. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे साधकांचे लिखाण वाचून या यागाच्या फलनिष्पत्तीची आपल्याला प्रचीती मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात यागाची फलनिष्पत्ती होण्याचे कारण हा याग चैतन्यमय अशा सनातनच्या वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात संपन्न झाला, हे आहे. तीर्थक्षेत्री होणार्या यागांप्रमाणेच या पवित्रपावन वास्तूत होणार्या यागाची फलनिष्पत्ती आहे. यावरून प्रत्यक्ष श्रीविष्णूचा अंशावतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले येथे वास्तव्यास असल्यामुळेच या वैकुंठरूपी सनातन आश्रमाच्या वास्तूची तीर्थक्षेत्रासम सात्त्विकता, चैतन्य आणि अगाध आध्यात्मिक माहात्म्य ठळकपणे अधोरेखित होते. यासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमाप्रती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! – सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (२५.७.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |