भाताच्या संशोधनासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि फिलिपाईन्स यांच्या मध्ये सामंजस्य करार !
दापोली – येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि फिलिपाईन्सस्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) यांच्या मध्ये भाताच्या संशोधनासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्सचे महानिर्देशक डॉ. अजय कोहली यांनी हा करार केला. या करारामुळे या दोन संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणे आता सुलभ होणार आहे.
१५ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सहाव्या आंतरराष्ट्रीय भात परिषदेमध्ये कुलगुरु डॉ. संजय भावे आणि प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे भात पैदासकार डॉ. भरत वाघमोडे सहभागी झाले आहेत.
भात हे कोकणातले प्रमुख पीक असून कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ते पिकवले जाते. कोकण कृषी विद्यापिठाने भातामध्ये भरीव संशोधन करून आतापर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार ३५ वेगवेगळ्या अधिक उत्पन्न देणार्या जाती विकसित केल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील पहिली संकरित जात तयार करण्याचा बहुमानही विद्यापिठाला प्राप्त झाला आहे.
या सामंजस्य करारानुसार विशेष करून भाताच्या विविध स्थानिक वाणांचे संकलन, वैशिष्ट्ये, सुधारणा त्याचसमवेत अधिक उत्पन्न देणार्या जाती, तसेच विविध किडी आणि रोगांना बळी पडणार्या जातींवर संशोधन करण्यात येणार आहे. त्याचसमवेत जलद संकरीकरण, कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या घटकांचा संशोधनात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापिठातील भातावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स येथे जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या कराराच्या वेळी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. उमाशंकर सिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उपनिर्देशक डॉ. संकल्प भोसले, दक्षिण आफ्रिकेचे संशोधन समन्वयक डॉ. अजय पंचभाई, डॉ. सुधांशू सिंग, संशोधन संचालक ईरी आणि अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.