वाचनाने अनुभवविश्व विस्तारते ! – उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
रत्नागिरी – मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रचार, प्रसारासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ आयोजित करण्यात येतो. पुस्तक वाचनाने आपले अनुभवविश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी केले.
येथील अल्पबचत सभागृहात मराठी भाषा समिती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे पुढे म्हणाल्या, ‘‘मराठी भाषेचा वापर अधिकाधिक व्हावा, यासाठी शासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्याच्या ‘मोबाईल’, समाजमाध्यमांच्या आभासी जगात पुस्तकाचे वाचन न्यून होत आहे; परंतु पुस्तक वाचनानेच आपले अनुभव विश्व विस्तारित जाते. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आवर्जुन सहभाग घ्यावा, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे.’’
या वेळी मराठी भाषा समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी प्रस्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सुमिता शिरभाते, साहाय्यक प्रकल्प अधिकारी रवींद्र कांबळे आदींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.