पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांना विरोध करणे म्हणजे देशभक्ती नव्हे ! – मुंबई उच्च न्यायालय
भारतात पाकिस्तान्यांवर बंदी घालण्याच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली !
मुंबई – ‘देशभक्त असण्यासाठी पाकमधील किंवा इतर कोणत्याही देशांमधील व्यक्तींसंदर्भात द्वेषभावना मनात बाळगण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांना विरोध करणे म्हणजे देशभक्ती नव्हे’, असे मत भारतात पाकिस्तान्यांवर बंदी घालण्याच्या मागणीची याचिका फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने पुढे म्हटले, ‘सध्या भारतात चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघही खेळत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ अन्वये ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण आणि एकोपा रहावा’, या उद्देशाने भारत सरकारकडून सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत.
याचिकेतून करण्यात आली होती ही मागणी !
‘देशातील सर्व आस्थापने, संस्था किंवा व्यक्ती यांना पाकिस्तानातील लोकांसह काम करण्यास किंवा त्यांची सेवा घेण्यास बंदी घालावी. पाकिस्तानी कलावंतांना व्हिसा देऊ नये. असे न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी चित्रपटसृष्टीतील फैझ अन्वर कुरेशी यांनी केली होती. ‘क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने पाकिस्तानी गायक आणि कलावंत यांना निमंत्रित करण्यात येईल अन् त्यामुळे भारतातील कलावंतांच्या रोजगार संधीवर गदा येईल’, असे कुरेशी यांनी याचिकेत म्हटले होते.
संपादकीय भूमिका‘जिहादी पाकच्या कुरापतींवर आळा घालण्यासाठी भारतीय सैन्य डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करत आहे. दुसरीकडे कलेला वाव मिळावा, यासाठी पाकिस्तानी कलाकारांना येथे बोलावणे कितपत सयुक्तिक आहे ?’, असा प्रश्न भारतीय जनतेला पडला आहे. यावर केंद्र सरकारने ठोस नि सुस्पष्ट भूमिका घेऊन जनतेची संभ्रमावस्था दूर केली पाहिजे ! |