सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिकवल्याप्रमाणे डोळ्यांवरील आवरण काढल्यावर स्पष्ट दिसू लागणे
‘मागील २ – ३ मास माझ्या डोळ्यांवर सतत आवरण येत होते. आवरण काढल्यावर तेवढ्यापुरते मला बरे वाटायचे. नंतर पुन्हा मला ‘डोळ्यांची आग होणे आणि अस्पष्ट दिसणे’, असे त्रास होत होते. डोळ्यांवरील आवरण कितीही वेळा काढले, तरी मला पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हते. मला ‘नेत्ररोग तज्ञांकडे डोळे तपासायला जावे लागेल’, असे वाटत होते.
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘स्वतःवरील त्रासदायक शक्तींचे आवरण कसे काढायचे ?’, हे शिकवण्यासाठी अभ्यासवर्ग घेणे
त्या सुमारास सद्गुरु गाडगीळकाकांनी एक अभ्यासवर्ग घेतला. त्यामध्ये त्यांनी आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी साधकांनी ‘स्वतःवरील त्रासदायक शक्तींचे आवरण कसे काढायचे ? स्वतःला होणार्या त्रासांवर उपायांचा नामजप कसा शोधायचा ?’, यांविषयी पुढच्या टप्प्याची नवीन पद्धत शिकवली. त्या अभ्यासवर्गाला मी उपस्थित राहिले होते.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी अभ्यासवर्गात डोळ्यांवरचे आवरण काढायला शिकवून साधकांकडून आवरण काढून घेतल्यावर स्पष्ट दिसू लागणे
सद्गुरु गाडगीळकाकांनी त्या अभ्यासवर्गात ‘डोळ्यांवरील आवरण कसे काढायचे ?’, याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि लगेच आमच्याकडून तसे आवरण काढून घेतले. मीही त्यांनी शिकवल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांवरचे आवरण काढले. त्यानंतर मला सभागृहात अगदी लख्ख प्रकाश जाणवला आणि मला स्वच्छ दिसू लागले. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘माझ्या डोळ्यांवर पुष्कळ आवरण असल्यामुळेच मला अस्पष्ट दिसत होते.’
३. कृतज्ञता
‘सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या उपायांचा प्रभाव किती त्वरित दिसतो’, हे लक्षात आले आणि त्यातून त्यांची आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमताही माझ्या लक्षात आली. सद्गुरु गाडगीळकाकांच्या समवेत डोळ्यांवरील आवरण काढल्यानेच हे शक्य झाले. यासाठी त्यांच्या चरणी आणि सद्गुरु गाडगीळकाकांच्या अभ्यासवर्गाला बसण्याची संधी दिल्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२३)