वेरूळ लेणी (छत्रपती संभाजीनगर) येथील छतावरील नटराजाच्या मूर्तीला तडे गेले !
पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : अभ्यासकांच्या मते हा गंभीर प्रकार !
छत्रपती संभाजीनगर – जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद असलेले जिल्ह्यातील वेरूळ लेणी येथील नंदीमंडपातील नैसर्गिक रंगाने रेखाटलेले सुरेख नक्षीकाम असलेले छत कोसळू लागले आहे, तर रंगमंडप काळवंडला असून त्याच्या छतावर कोरलेल्या नटराजाच्या मूर्तीलाही तडे गेले आहेत. परिणामी ही मूर्तीही कोसळण्याची भीती लेणी अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र याकडे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (‘ए.एस्.आय.’ला) लक्ष द्यायला वेळ नाही. (छतावरील नटराजाची मूर्ती आणि नक्षीकाम हे कोसळत असतांनाही दुर्लक्ष करणारा असंवेदनशील पुरातत्व विभाग ! कामचुकार अधिकार्यांंच्या वेतनातून हानीभरपाई घ्यायला हवी ! – संपादक)
१. वेरूळ लेणी येथील कैलास मंदिरात १८ ते २० देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. नंदीमंडप हा अत्यंत सुंदर कोरलेला असून पर्यटकांना आकर्षित करतो. मंडपाच्या छताला अगोदर माती आणि नंतर चुन्याचा लेप दिलेला आहे. त्यावर नैसर्गिक रंगाने विविध नक्षी काढलेल्या आहेत
२. या सर्वांचे जतन करण्यात पुरातत्व विभाग अल्प पडत आहे. पाऊस, हवा आणि ऊन यांमुळे रंगमंडपावर बुरशी चढली असून त्यामुळे तो काळवंडला आहे. रंगमंडपात नटराजाची मूर्ती कोरलेली आहे. आता या मूर्तीला तडे गेले असून ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. मूर्तीच्या संवर्धनाची आवश्यकता आहे.
छतावरील नटराजाच्या मूर्तीला तडे जाणे गंभीर ! – लेणी अभ्यासक
वेरूळ लेणीचे अभ्यासक योगेश जोशी म्हणाले, ‘‘नंदीमंडपातील नक्षीकाम आणि रंगमंडपातील छतावरील नटराज मूर्तीला भेगा पडल्या आहेत. हा गंभीर प्रकार आहे. ही ऐतिहासिक वास्तू जपणे हातात असून ‘ए.एस्.आय.’ने याकडे तात्काळ लक्ष देऊन जतन-संवर्धनाचे काम करावे.’’
पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत म्हणाले, ‘‘नंदीमंडपातील नक्षीकाम आणि रंगमंडपाच्या छतावरील नटराज मूर्तीला भेगा पडल्या असल्यास त्याची पहाणी करू. खरेच असा प्रकार असेल, तर तातडीने जतन-संवर्धनाचे काम हाती घेतले जाईल.’’ (पुरातत्व विभागाने हे अगोदरच का पाहिले नाही ? लेणी अभ्यासकांनी सांगितल्यावर त्यानंतर उपाययोजना काढणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंची धार्मिक स्थळांच्या संवर्धनासाठी काहीही न करणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा ! |