दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

गैरहिंदूंना प्रवेशबंदी करा !

 सकल हिंदु समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांना निवेदन

लांजा, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या ‘संदीप स्मृती’मंडळाच्या पदाधिकार्‍यांना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखणे, तसेच दांडियामध्ये गैरहिंदूंना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २४ ऑक्टोबरपर्यंत हिंदूंचा ‘नवरात्रोत्सव’ साजरा होत आहे. या निमित्ताने लांजा शहरामध्ये ठिकठिकाणी विविध मंडळाच्या वतीने दांडियांचे आयोजन केले आहे. या उत्सवामध्ये हिंदु धर्मियांनी भक्तीभावाने सहभागी होणे अपेक्षित असतांना दांडियाला मात्र करमणुकीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्सवातील धार्मिकता आणि सात्त्विकता लोप पावत आहे. ही गोष्ट हिंदु धर्मासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हानीकारक आहे. त्यामुळे आपल्या हिंदु धर्माचा र्‍हास होत आहे. सद्य:स्थितीत या दांडियांमध्ये हिंदु धर्मातील विविध देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष किंवा सैनिक यांची वेशभूषा करून दांडिया खेळला जात आहे. त्यामुळे त्यांचे विडंबन होत आहे.

दांडिया हा हिंदु धर्माचा उत्सव असतांना त्यामध्ये गैरहिंदूंना प्रवेश दिल्यामुळे आपण धर्माचा आणि त्या ठिकाणच्या सात्त्विकतेचा र्‍हास करत आहोत. तसेच गैरहिंदूंना प्रवेश दिल्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही देशभरामध्ये वाढत आहेत. तरी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून वाचवण्यासाठी आपणास ‘सकल हिंदु समाज’ लांजाच्या वतीने विनंती आहे की, दांडियामध्ये देवीदेवता, राष्ट्रपुरुष, सैनिक आणि संत यांचे विडंबन होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उत्सवामध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरण रोखण्यासाठी गैरहिंदूंना प्रवेश देण्यात येऊ नये. यासाठी दांडियात सहभागी होणार्‍या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्‍या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि उत्सवाची सात्त्विकता टिकवण्यासाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे, आदी उपाययोजना करता येतील.