अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या साधूची गळा चिरून हत्या !
भूमीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील राम सहारे नावाच्या साधूची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. राम सहारे हे हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खोलीत रहात होते. या खोलीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेवर खोलवर जखमा आढळल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मंदिरात पोचले आणि त्यांनी अन्वेषण चालू केले आहे. आंबेडकर नगरच्या भिटी येथील सुमारे १० एकर भूमीच्या मालकीवरून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. राम सहारे हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते.
१. राम सहारे यांची हत्या झाली, तेव्हा मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचे आढळून आले आहे. हत्या झाल्यापासून मंदिर परिसरात रहाणारा ऋषभ शुक्ला नावाचा तरुण बेपत्ता आहे. त्याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
२. हनुमानगढी मंदिरात काही दिवसांपूर्वीच एका नागा साधूचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ते प्रकरण आत्महत्येचे असल्याचे बोलले जात होते.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्या किंवा आत्महत्या या भूमीच्या किंवा संपत्तीच्या वादातून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणावरून अचानक साधूंच्या हत्यांची शृंखला कशी चालू झाली ? यामागील षड्यंत्र पोलीस शोधून काढतील का ? |