सिंधदुर्ग : बांदा केंद्रशाळेसाठी इमारत मिळावी, यासाठी पालकांचे ‘शाळा बंद’ आंदोलन चालू !
सावंतवाडी : जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा, अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांदा केंद्रशाळेसाठी ४ वर्गखोल्यांची इमारत परत मिळावी, या मागणीसाठी पालकांनी १८ ऑक्टोबरपासून ‘शाळा बंद’ आंदोलन चालू केले आहे. ‘जोपर्यंत ४ वर्गखोल्यांची इमारत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार’, असा निर्धार पालकांनी केला आहे.
जिल्ह्यात पटसंख्येच्या अभावी काही शाळा बंद होण्याची स्थिती असतांना बांदा केंद्रशाळेची पटसंख्या २८३ इतकी आहे. या शाळेच्या ४ वर्गखोल्यांच्या इमारतीचा वापर एक खासगी संस्था करत आहे. या जागेविषयी संबंधित संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्यामध्ये झालेला भाडेकराराचा कालावधी संपला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ बांदा केंद्रशाळेच्या कह्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कृती झाली नाही, असा आरोप करत ‘संबंधित इमारत बांदा केंद्रशाळेला मिळावी’, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी हे ‘शाळा बंद’ आंदोलन चालू केले आहे.
(सौजन्य : MAZA SINDHUDURG BREAKING NEWS)
या आंदोलनाच्या वेळी आलेल्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके आणि उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाशैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? |