श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री खंडोबा मंदिराच्या गाभार्यातून भाविकांना दर्शन घेऊ द्यावे !
माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी !
जेजुरी (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबाच्या गडावर देवाचे नवरात्र (घटस्थापना) चालू आहे. ग्रामस्थ, तसेच भाविक यांना मुख्य देवाच्या गाभार्यामध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी अनुमती नाही. हे चुकीचे असून ‘किमान नवरात्र होईपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी काही घंटे ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करावी’, अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने २ मासांपूर्वी बैठक घेतली होती. तेव्हा घटस्थापनेपूर्वी ‘मंदिर सर्वांना दर्शनासाठी उघडे ठेवू’, असे सांगितले होते; परंतु आता काम अपूर्ण असल्याचे कारण देत उंबरठ्यातून दर्शन घ्यायची सक्ती केली जात आहे. ‘महत्त्वाच्या व्यक्ती किंवा विश्वस्तांचे नातेवाईक आल्यास त्यांना गाभार्यातून दर्शन घेण्यास सोडले जाते. मग ग्रामस्थ आणि भाविक यांना का सोडले जात नाही?’, असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला.