राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे, टोलवसुलीवर लक्ष ठेवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर मनसेची करडी नजर असणार आहे. आता बघू टोलवाले कसे फसवतात ते ? अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलवसुली करणार्यांना दिली आहे. १८ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी राज ठाकरे यांनी प्रादेशिक परिवहन विभागामध्ये नियमित सहस्रावधी नवीन गाड्यांची नोंदणी होते आणि तरीही टोलनाक्यांवर गाड्यांची संख्या तेवढीच कशी ? जर गाड्या वाढल्या तर टोलही अधिक जमा होत आहे आणि टोल अधिक जमा होत आहे, तरी वाढवायची आवश्यकता काय ? किंवा टोलवसुलीचा अवधी तितकाच कसा ? असे प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी राज ठाकरे म्हणाले की, ‘‘जगाच्या पाठीवर अशी कुठे नसेल अशी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात आहे. येथे अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात अशी स्थिती आहे. शिवसेना सत्तेतही आणि विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थितीही अशीच आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारणाचा विचका करून ठेवण्यात आला आहे.’’