घटस्थापनेच्या दिवशी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या शिबिराचे आयोजन !
विरार येथे आदिशक्ती ढोल-ताशा पथक आणि हिंदु जनजागृती समिती यांचा उपक्रम !
विरार (पालघर) – घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्ती ढोल-ताशा पथक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विरार (पूर्व) येथील अधिवक्ता चंदनदास सोलंकी इंग्लिश स्कूल, साईनगर येथे एकदिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात पथनाट्य, व्याख्यान आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण यांचा समावेश होता. या वेळी ५२ महिला आणि युवक यांनी त्यात सहभाग घेतला. दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीत यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ढोल-ताशा पथकाने ‘एकतर्फी प्रेम – महिलांवरील आघात’ या विषयावर पथनाट्य सादर केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित महिला आणि युवक यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवली. कु. पूजा राणे आणि कु. नुपूर मुरबाडकर यांनी महिला सुरक्षेच्या संदर्भात महिलांचे अधिकार, महिला सुरक्षेसाठी पोलिसांच्या यंत्रणा यांविषयीची माहिती दिली. या वेळी येथील स्थानिक माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या आयोजनात आदिशक्ती ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष सर्वश्री आदित्य जोशी, उपाध्यक्ष समीर सावंत, खजिनदार मृगांक नाईक आणि त्यांचे सहकारी सिद्धेश तवटे, सुजित मोरे, हितेश सोलीम, कु. पूजा राणे, कु. नुपूर मुरबाडकर, सौ. श्वेताताई मोरे आणि कु. वैष्णवी तवटे यांचे सहकार्य लाभले.
अभिप्राय !
१. मी मुलीला घेऊन शिबिरात आले होते. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून मला त्याची आवश्यकता लक्षात आली आणि मीही शिकण्यासाठी उभी राहिले.
२. समाजात वावरतांना मनावर दडपण होते. ‘आता विरोध करायला हवा’, अशी मानसिकता शिबिरामुळे निर्माण झाली आहे.
३. समाजात अनेक पटींनी पैसे घेऊन प्रशिक्षण शिकवले जाते; परंतु समिती विनामूल्य प्रशिक्षण देऊन चांगले कार्य करत आहे.
आदिशक्ती ढोल-ताशा पथकाचे सामाजिक कार्य !
आदिशक्ती ढोल-ताशा पथक हे समाजसाहाय्य करण्यासाठी ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून पैसे उभारून सामाजिक उपक्रम राबवते. पथनाट्य, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमे यांतून सामाजिक संदेश देणे, आदिवासी पाड्यातील अनाथ, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, आदिवासी पाड्यात मुलांना फराळ वाटप करणे, इत्यादी उपक्रम ते करतात. नुकतेच विरार-मनवेल पाडा नाक्यावर त्यांनी पथनाट्य सादर करून ते सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते.