नेवासे (अहिल्यानगर) येथील विकासकामांवरील स्थगिती उठवली !
७८ कोटी रुपयांच्या विकासकामांना वेग
अहिल्यानगर – आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळामध्ये नेवासे तालुक्यातील विविध विकासकामांच्या अंतर्गत ४४ कामांसाठी ७१ कोटी रुपये आणि अन्य १६ कामांसाठी ७ कोटी रुपयांची कामे संमत केली होती. त्यानंतर सत्तांतर झाले. नवीन सरकारने या कामांना स्थगिती दिली. स्थगिती उठवण्यासाठी आमदार गडाख यांच्या वतीने औरंगाबाद खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. संमत कामांवरील स्थगिती उठवण्याचा आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे. त्यामुळे ७८ कोटी रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे. स्थगिती उठवल्यामुळे विकासकामांना वेग येणार आहे, तसेच तालुक्यातील विविध विकासकामांचे अजूनही ७० ते ८० कोटी रुपयांचे विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल आहेत. त्याचा पाठपुरावा करून तीही कामे त्वरित मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.