भक्तीसत्संगामुळे साधिकेमध्ये झालेले सकारात्मक पालट !
१. भक्तीसत्संगामुळे भाव निर्मिती होऊन प्रत्येक कृतीला भावाची जोड देता येणे आणि ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ अल्प होतात’, याची खंत वाटणे
‘भक्तीसत्संग ऐकण्यापूर्वी माझे साधनेचे प्रयत्न यंत्रवत होते. भक्तीसत्संगामुळे भाव निर्मिती होऊन प्रत्येक कृतीला भावाची जोड देता आली. पुढे ते सगळे सहजपणे होऊ लागले. त्यामुळे माझ्यातील कृतज्ञताभाव वाढला. ‘मी काही करत नसून गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) करून घेत आहेत’, ही जाणीव सतत होऊ लागली. ‘परम पूज्य गुरुमाऊली माझी आणि माझ्या कुटुंबियांची प्रत्येक क्षणी काळजी घेतात; पण माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ अल्प होतात’, याची मला खंत वाटू लागली.
२. प्रसंग स्वीकारता येऊन गुरुदेवांना शरण जाणे आणि त्यांच्या चरणी आत्मनिवेदन होणे
पूर्वी साधनेत आणि कौटुंबिक स्तरावर होणारे प्रसंग मला स्वीकारता येत नव्हते. त्यात बराच वेळ अडकणे व्हायचे. त्याचा माझ्या प्रकृतीवर परिणाम व्हायचा. साधकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह निर्माण व्हायचे. त्याचाही मला त्रास व्हायचा. भक्तीसत्संगामुळे मला प्रसंग स्वीकारता येऊन आणि गुरुदेवांना शरण जाता येऊन त्यांच्या चरणी आत्मनिवेदन होऊ लागले. त्यामुळे प्रसंगांचा ताण येणे बंद झाले. माझ्याकडून स्थिर राहून कृती होऊ लागली.
३. मनाने कृती न करता विचारून घेणे
पूर्वी आत्मनिवेदन होत होते; परंतु ‘कर्तेपणा घेणे आणि स्वतःच्या मनाने करणे’, हे अधिक प्रमाणात होते. आता माझा साधना आणि व्यवहार करतांना विचारून करण्याचा भाग वाढला आहे. मनाने कृती होत असेल, तर गुरुकृपेने मला लगेच त्याची जाणीव होते आणि विचारून घेण्याचा भाग होतो.
४. ‘प्रत्येक प्रसंगात गुरुदेवच सर्वांना बुद्धी देऊन योग्य तेच करून घेणार आहेत’, असा विचार केल्यामुळे मन शांत होणे
भक्तीसत्संगामुळे ‘प्रत्येक प्रसंग गुरुदेव बघत आहेत. आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे’, असे होऊ लागले. ‘एखाद्या प्रसंगात इतरांनी माझे ऐकावे; कारण मी त्यांच्या चांगल्यासाठी सांगत आहे’, असे मला तीव्रतेने वाटायचे. आता माझ्याकडून त्यांना ‘एखाद्या गोष्टीची जाणीव करून देण्याची संधी गुरुदेवांनी मला दिली आहे’, या भावाने सांगणे होते. ‘त्यांनी माझे ऐकावे’, अशी माझी अपेक्षा नसते. ‘त्यांना योग्य वेळी योग्य ते करण्याची बुद्धी गुरुदेवच देणार आहेत आणि गुरुदेवच त्यांच्याकडून योग्य कृती करून घेणार आहेत’, असा विचार माझ्या मनात असतो. त्यामुळे माझे मन अस्वस्थ होत नाही. कधी झाले, तरीही ते लवकर शांत होते.
‘भक्तीसत्संगामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे नकळत निर्मूलन होऊन भाववृद्धी होत आहे’, असे असतांनाही ‘माझे प्रयत्नांतील सातत्य अल्प पडते’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करते. ‘आमच्यातील साधनेचे गांभीर्य वाढवून पुढील प्रत्येक क्षण केवळ साधना म्हणूनच जगायचे आहे. तसे प्रयत्न आपणच करून घ्यावे’, ही गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– एक साधिका, नागपूर.(१०.९.२०२३)
नवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगात साधकाला आलेली अनुभूती आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती वाटलेली कृतज्ञता !‘नवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगात मी दुर्गादेवीला प्रार्थना करत असतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्री दुर्गादेवीच्या रूपात दिसल्या आणि ‘दुर्गादेवीच आमच्याकडून तिची (देवीची) उपासना करवून घेत आहे’, असे अनुभवायला आले. या अनुभूतीनंतर माझे मन शांत झाले. हृदयात शीतलता अनुभवता आली आणि दुर्गादेवीप्रती कृतज्ञता वाटली. जशी शक्तीस्वरूपिणी देवी समस्त ब्रह्मांडाची माता आहे. त्याचप्रकारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सर्व साधकांचे पालन-पोषण करणार्या माता आहेत. समस्त जिवांचे रक्षण करणार्या माता सद्गुरूंच्या रूपातून स्थुलातून साधकांच्या समवेत आहेत. साधनेच्या पहिल्या टप्प्यात गुरुदेवांनी माझ्याकडून कुलदेवीची, श्री दुर्गा परमेश्वरीदेवीची उपासना करून घेतली आणि आता त्यांनी मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पदरात घातले आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. प्रसन्न वेंकटापूर, भाग्यनगर (१९.१०.२०२१) |