विवियन सिल्व्हर यांचा मानवाधिकार !

संपादकीय

विवियन सिल्व्हर – शांतता समर्थक कॅनेडियन-ज्यू कार्यकर्तीचे हमास दहशतवाद्यांनी अपहरण करून केली हत्या

जागतिक स्तरावर मानवाधिकारांचे कार्य करणार्‍यांच्या वर्तुळात विवियन सिल्व्हर या महिला मानवाधिकार कार्यकर्तीचे नाव सुपरिचित आहे. ७४ वर्षांच्या सिल्व्हर या जन्माने ज्यू आहेत; मात्र आयुष्यातील ५० वर्षे त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवाधिकारांसाठी, तसेच इस्रायलचे सरकार आणि सैन्य यांना दूषणे देण्यात घालवली. त्यांनी कर्करोगग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांना औषधोपचार मिळण्यासाठी इस्रायलच्या रुग्णालयांमध्ये भरती केले. एवढेच नव्हे, तर इस्रायलच्या गल्लीबोळांतून इस्रायलच्या नावाने बोटे मोडत शांती मोर्चेही काढले. त्यांना जगात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. ‘नोबेल’च्या शांतता पुरस्कारासाठीही त्यांचे नाव पुढे करण्यात आले होते. पॅलेस्टिनींसाठी एवढे सर्व करूनही त्यांच्या हाती काय लागले ? ७ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर त्या बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. हमासच्या आतंकवाद्यांनी त्यांचे तुकडे केल्याचे सामाजिक माध्यमांवर सांगितले जात आहे. आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जे सिल्व्हर यांच्या वाट्याला आले, ते वेदनादायी आहे. ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांच्यासाठी स्वतःचे धर्मबांधव असणार्‍या ज्यूंची बोलणी खाल्ली, त्या पॅलेस्टिनी लोकांसाठी लढणार्‍या (?) हमासच्या आतंकवाद्यांनी त्यांचे काय केले ?, हे कळायला काहीच मार्ग नाही. या पार्श्वभूमीवर ‘मानवाधिकार’ या विषयावर जागतिक व्यासपिठावर जोरकस चर्चा होणे आवश्यक आहे. शांतता, सौहार्दता कुणाला नको आहे ? असे असले, तरी ‘आतंकवादी आणि त्यांची पाठराखण करणारे यांच्या मानवाधिकारांविषयी आग्रही राहून त्यांना चुचकारून जगात शांतता नांदणार आहे का ?’, याविषयी जगभरातील समस्त मानवाधिकार कार्यकर्त्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. सिल्व्हर यांनी ज्या समूहाच्या मानवाधिकारांची पाठराखण करण्यासाठी पूर्ण आयुष्य वेचले, त्यांना अशा यातना मिळणे, हा समस्त मानवाधिकार विचारवंतांचा वैचारिक पराभव आहे.

विवियन सिल्व्हर – शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटणारी स्त्री !

सिल्व्हर यांच्या आयुष्याची किंमत शून्य !

सिल्व्हर गेली कित्येक वर्षे इस्रायलमधील किबुट्झ येथे वास्तव्य करत होत्या. तेथे राहून त्यांनी पॅलेस्टिनींच्या मानवाधिकारांसाठी लढा दिला. त्यामुळे हमासच्या आतंकवाद्यांनी किबुट्झवर आक्रमण केल्यावर येथे ‘आपली माणसे कोण आहेत आणि परके कोण आहेत ?’, याची माहिती मिळवली नव्हती का ? जी महिला पॅलेस्टिनींच्या मानवाधिकारांसाठी लढते, तिला सन्मानाने सोडून देण्याची बुद्धी हमासच्या आतंकवाद्यांना का झाली नाही ? कारण स्पष्ट आहे. सिल्व्हर यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना ‘आपले’ मानले; मात्र पॅलेस्टाईनच्या मातीत निपजलेल्या हमासच्या आतंकवाद्यांनी त्यांना ‘आपले’ मानले नाही. त्यांच्यासाठी सिल्व्हर या ज्यू होत्या. त्यामुळे सिल्व्हर यांनी पॅलेस्टिनींना कितीही कुरवाळले असले, तरी हमासच्या लेखी त्या शत्रूराष्ट्राच्या नागरिक होत्या आणि त्यांना यातना देणे, त्यांचा छळ करणे, हा हमासवाल्यांचा जन्मसिद्ध अधिकार होता. त्यामुळे हमासचे आतंकवादी त्यांच्या जिवावर उठले.

इस्रायलने युद्ध चालू केल्यावर इस्रायलला ‘नरभक्षक’, ‘पाशवी’ म्हणून हिणवण्यात आले. ‘इस्रायलने गाझावर आक्रमण करून निष्पाप लोकांचा बळी घेतला’, असा आरोप त्याच्यावर आहे. पॅलेस्टिनी लोकांच्या मानवाधिकारांविषयी बोलणारे इस्रायली नागरिकांच्या मानवाधिकारांविषयी बोलायला सिद्ध नाहीत. त्याही पुढे जाऊन ‘सिल्व्हर बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी किंवा ‘त्यांचे पुढे काय झाले ?’, हे जाणून घेण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते काहीही ठोस प्रयत्न करतांना दिसत नाहीत. यावरून ‘मानवाधिकारवाल्यांना सिल्व्हर यांच्या जीवनाचे काहीच मोल नाही का ?’, हा प्रश्न पडतो आणि मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक कोतेपणाही दिसून येतो.

मानवाधिकार चळवळीचे अपयश !

मानवाधिकारवाले सिल्व्हर यांच्या मानवाधिकारांसाठी हमासच्या विरोधात मेणबत्ती मोर्चे किंवा शांती मोर्चे काढणार आहेत का ? किंवा या आतंकवादी संघटनेच्या प्रमुखाच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार का ? अशा कृती अजून तरी झालेल्या नाहीत किंवा ‘भविष्यात होतील’, अशी आशाही नाही. या घटनेतून पॅलेस्टिनी नागरिकांचेही खरे स्वरूप जगासमोर आले. ‘सिल्व्हर यांना सुखरूप सोडावे’ यासाठी किंवा ‘त्यांचे पुढे काय झाले ?’ हे जाणून घेण्यासाठी किती पॅलेस्टिनी नागरिकांनी हमासच्या आतंकवाद्यांना जाब विचारला ? या उलट हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केल्यावर, तेथील महिलांवर बलात्कार केल्यावर, लहान मुलांचे गळे चिरल्यावर पॅलेस्टाईनमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. त्यामुळे अशा समाजाच्या मानवाधिकारांविषयी बोलणे किंवा कृती करणे, हा एकप्रकारे समस्त मानवजातीच्या विरोधात केलेला द्रोह आहे. पॅलेस्टाईनने स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि स्वतःला जगासमोर ‘पीडित’ म्हणून रंगवण्यासाठी सिल्व्हर यांचा पुरेपूर वापर करून घेतला अन् स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्यांना मरण्यासाठी सोडून दिले.

मानवाधिकारांचे भूत ज्यांच्या मानगुटीवर बसले आहे, त्यांच्यासाठी सिल्व्हर प्रकरण हे डोळ्यांत अंजन घालणारे आहे. आतंकवादी, जिहादी, धर्मांध यांच्याविषयी करुणा बाळगणे, ही समाजविघातक वृत्ती आहे. त्याचा शेवट हा दुःखद असतो. जिहाद्यांना प्रेमाची, आपुलकीची किंवा मानवाधिकारांची भाषा समजत नाही. त्यांना द्वेषाची आणि हिंसेची भाषा समजते. त्यामुळे आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी झटणारे आतंकवाद्यांपेक्षाही अधिक धोकादायक आहेत. अशांचे पीक फोफावले, तर मानवतेची हत्या करणार्‍या या आतंकवाद्यांविषयी लोकांना सहानुभूती वाटेल. अशा गांधीगिरी करणार्‍या जमातीमुळे जगातील सुसंस्कृत, सहिष्णु आणि शांतीप्रिय समाज नष्ट होईल. असे होऊ नये, यासाठी मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक पराभव करून त्यांना आरसा दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे.

आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी बोलणारे कधी आतंकवादाने पीडित लोकांच्या अधिकारांविषयी बोलत नाहीत !