सिंधुदुर्ग : शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा
मसुरे केंद्र शाळेची समस्या सोडवतांना खैदा, कातवड शाळेत निर्माण झाली समस्या !
मालवण : तालुक्यातील मसुरे केंद्र शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी १६ ऑक्टोबर या दिवशी तेथील ग्रामस्थ आणि पालक यांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले होते. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतांना प्रशासनाने १७ ऑक्टोबर या दिवशी तालुक्यात खैदा, कातवड येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकाला मसुरे केंद्र शाळेत तात्पुरत्या स्वरूपात पाठवले. त्यामुळे खैदा येथील संतप्त पालकांनी मुलांसह मालवण पंचायत समितीच्या कार्यालयातच शाळा भरवून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
(सौजन्य : Jai Maharashtra News)
शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांत शिक्षक नसल्याचे किंवा एकच शिक्षक असल्याचे चित्र आहे. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाल्यापासून जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. बर्याच वेळा एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्या शाळेत पाठवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे एका शाळेतील समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात दुसर्या ठिकाणी समस्या निर्माण होत आहे. अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले आहे. गावातील शिक्षकाचे तात्पुरत्या स्वरूपात अन्य शाळेत स्थानांतर केल्यास पालक, तसेच ग्रामस्थ ‘आमच्या मुलांच्या होणार्या शैक्षणिक हानीला कोण उत्तरदायी आहे ?’, असा प्रश्न विचारत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नाविषयी संपर्क केल्यास प्रशासकीय अधिकारीही भ्रमणभाष उचलत नसल्याने पालकांमधून तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. असाच प्रकार खैदा, कातवड येथील शाळेविषयी घडला. गटशिक्षणाधिकारी भ्रमणभाष उचलत नसल्याने पालकांनी मुलांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात आणून तेथेच शाळा चालू केली. अन्य शाळेत नियुक्त केलेल्या शिक्षकाला पुन्हा मूळ शाळेत आणल्याविना आम्ही कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. जे परजिल्ह्यातील शिक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत होते, त्यांनी स्वत:च्या मूळ जिल्ह्यात स्थानांतर करून घेतले. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समस्येत अजूनच भर पडली. परिणामी प्रशासनाला सर्व प्राथमिक शाळांतून पुरेसे शिक्षक देणे अशक्य होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे शिक्षक भरती करणे आणि या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. असे झाले, तरच ही समस्या सुटू शकणार आहे.