भारतभूच्या रक्षणार्थ अभंग तप करणारे नारायण ऋषि !
भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक ५)
भारताला थोर ऋषि परंपरा लाभली आहे. असे असूनही भारतियांना त्यांच्याविषयी अत्यल्प माहिती आहे. सध्याच्या पिढीला ऋषि परंपरेविषयी अवगत व्हावे, त्यांचे तपसामर्थ्य ध्यानात यावे, यासाठी ऋषींची माहिती, त्यांचे सामर्थ्य या लेखाद्वारे जाणून घेऊया.
१. नारायण ऋषींनी अभंग समाधी लावणे
‘नारायण ऋषि गंधमादन पर्वतावर तप करत होते. गंधमादन पर्वत हिमगिरीच्या पायथ्याशी आहे. वर्षामागून वर्षे जात होती. नारायण ऋषींच्या तपात व्यत्यय नव्हता. नारायण ऋषींनी तपाला प्रारंभ केला, त्या वेळी जी रोपे भूमीत रुजली होती, त्यांचे महावृक्ष झाले होते. पशू, पक्षी, जनावरे, माणसे यांच्या दोन पिढ्या जन्माला आल्या, जगल्या आणि संपल्याही; पण नारायण ऋषींची समाधी अभंग होती अखंड होती.
२. नारायण ऋषींच्या तपाने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होऊन ते ‘इंद्र’पद मिळवतील, या भयाने इंद्राने त्यांचे तप भंग करण्यासाठी अप्सरा पाठवणे
त्यांचा देह सुकून गेला होता. पृथ्वीवर पुण्य अनोतात वाढत होते. इथली माणसे देव झालीत तर ? इथेच स्वर्ग होईल आणि नारायण ऋषींना इंद्रपद मिळाले तर ? पृथ्वीवरच्या मानवाकडे स्वर्गाचे साम्राज्य जाणे अर्थातच इंद्राला मानवणारे नव्हते. नारायण ऋषीचा तपोभंग करायच्या विचाराने तो पृथ्वीवर आला. सिंह, वाघ, लांडगे वगैरे क्रूर श्वापदे त्यांच्या अंगावर घातली, तर त्यांच्या तपाच्या प्रभावाने ती क्रूर श्वापदे दिपतील आणि गोगल गायीसारखे होतील.
शेवटचा बिनतोड तोडगा कामदेवाच्या आक्रमणाचा ! ऋषींना मोहित करण्याकरता अप्सरांचा संघच उतरला. त्यांत सुस्तनी, मृगनयना, नितंबिता होती. सुकेशा, सुरती, मिहकली, अधनचपला, गजगामिनि, कमला, तिलोत्तमा अशा एकपेक्षा एक सरस सुंदर अप्सरा ! कामदेव सज्ज झाला. आसमंत कामभावाने भरून गेला.
३. समाधीतून उठलेल्या नारायण ऋषींनी स्वर्गातील अप्सरा फिक्या पडतील, अशा ‘उर्वशी’ नावाच्या अप्सरेची निर्मिती करून इंद्राला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे
नारायण ऋषि समाधीतून जागले. त्यांनी डोळे उघडले, त्या अप्सरा पाहिल्या. ते हसले. त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही कशाकरता आलात ?’’ त्या अप्सरा त्या तपाप्रभावाने हतबुद्ध झाल्या. घाबरल्यात, थरथर कापू लागल्यात ‘‘तुम्हाला कुणी पाठवले ?’’ तिलोत्तमेने धीर धरून सांगितले. ‘‘देवराज इंद्राने !’’
ऋषींना उमगले. या नटव्या बाहुल्यांना इंद्राने पाठवले तर ! माझा तपोभंग करण्याकरता पाठवले आहे, तर देवराज इंद्र खरोखरचे अक्कलशून्य आहे.’’ आणि ऋषीनीं तपः सामार्थ्याने अशा सुंदरी निर्माण केली की, तिथे असलेल्या सगळ्या अप्सरांचे सौंदर्य एकवटले, तरी त्या नवीन निर्मिलेल्या सुंदरीच्या नखाचीही सर यायची नाही. त्या लावण्याच्या तेजापुढे त्या स्वर्गातील अप्सरा निष्प्रभ झाल्या. त्या अप्सरा त्या सुंदर कामिनीच्या दासीसारख्या दिसत होत्या. त्या सौंदर्याने वसंत कोमेजला. शरदाचा चंद्र लाजला. शृंगारराज मनाने फिका पडला. सगळी सृष्टी स्तिमित झाली.
‘‘कुठे आहे तुमचा इंद्र?’’ ऋषींनी विचारले. देवराज इंद्र आला. तो लटलट कापत होता. ‘‘देवराज ! वासनाच जर पुरवायच्या असतील, तर मी अशा स्वर्गांगनापेक्षा कितीतरी सरस सुंदरी निर्माण करू शकतो.’’ इंद्र लाजेने चूर झाला होता. ‘‘देवराज अप्सरांचा भोग आणि कुत्र्याला मिळणार मैथुन सुख यांत कसल अंतर ? या अप्सरा तुम्ही मला भेट म्हणून पाठवल्या. आता मी तुम्हाला ही भेट देतो. घेऊन जा.’’ नारायण ऋषींनी उर्वशी अप्सरेला इंद्राला भेट म्हणून दिली.
नारायण ऋषि काही इंद्रपदाकरता करता तप करत नव्हते. भारतभूच्या रक्षणार्थ त्यांचे तप होते, हे इंद्राला उमगले आणि त्या स्वर्गांगनांसह तो स्वर्गात परतला.’
(यातून ऋषींचे अचाट तपसामर्थ्य, तपोबलामुळे त्यांना प्राप्त झालेली शक्ती आणि सिद्धी दिसून येते. असे महान तपस्वी ऋषिमुनी भारतभूला लाभले, हे भारतियांचा महद्भाग्यच ! – संकलक)
– (साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२०)