गंगापूर शहरातील अवैध पशूवधगृहे बंद करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे उपोषण !
गंगापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपोषणास प्रारंभ केला आहे. या संदर्भात ‘गोकुळधाम गोरक्षण सेवाभावी संस्थे’च्या वतीने पुढाकार घेऊन शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, अन्यथा उपोषण केले जाईल, अशी चेतावणी ४ ऑक्टोबर या दिवशी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला दिली होती; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हिंदुत्वनिष्ठांनी उपोषणास प्रारंभ केला आहे. (निवेदन देऊनही प्रशासन त्याची नोंद का घेत नाही ? प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का ? या प्रकरणी पालकमंत्री आणि तेथील आमदार, खासदार यांनी लक्ष घालून अनधिकृत पशूवधगृहे बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी आहे. – संपादक)
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना शहरात छुप्या पद्धतीने गाय, बैल आणि लहान वासरे यांची सर्रासपणे कत्तल चालू आहे. या संदर्भात ३० सप्टेंबर या दिवशी गंगापूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत गायीच्या चरबीपासून बनवण्यात आलेला डालडा आणि तूप यांचे डबे आढळून आले होते. त्यामुळे या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहरातील पशूवधगृहे नगरपालिकेच्या अधिकारकक्षेत येत असल्याने नगरपालिकेने कठोर कारवाई करून ती बंद करावीत, असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनाला विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ संघटनांना उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ? कि प्रशासनाच्या संमतीनेच ही पशूवधगृहे चालू आहेत ? |