स्वयंपाकघरात स्वच्छता न ठेवणार्‍या उपाहारगृहांना काम थांबवण्याचा आदेश ! 

मुंबईतील १५ उपाहारगृहांच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ! 

मुंबई – परवान्याविना व्यवसाय करणार्‍या आणि स्वयंपाकघरात स्वच्छता न ठेवणार्‍या मुंबईतील १५ उपाहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. या उपाहारगृहांना काम थांबवण्याचा आदेश दिला आहे.

१. उपाहारगृहामध्ये ग्राहकांना दिल्या जाणार्‍या अन्नामध्ये मृत उंदीर आढळल्यानंतर प्रशासनाने ऑगस्टपासून मुंबईतील १३ विभागांमध्ये उपाहारगृहांची पडताळणी चालू केली.

२. आतापर्यंत एकूण १५१ उपाहारगृहांची पडताळणी झाली असून त्यापैकी १३७ उपाहारगृहांना सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ७ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उपाहारगृहांच्या लक्षात आलेल्या त्रुटी !

नियमांचे पालन न करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! 

१. पडताळणीच्या वेळी अनेक उपाहारगृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव होता. अनेक ठिकाणी कचर्‍याचे डबे उघडेच आढळले. त्यावर झाकणे नव्हती. उपाहारगृहामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना हातात ‘ग्लोव्हज’ आणि डोक्यावर ‘टोप्या’ घालाव्या लागतात, ‘ॲप्रन’ घालावे लागतात; पण तसे नियम पाळले जात नाहीत.

२. हॉटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. यावरून कर्मचार्‍यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराची बाधा नसल्याचे स्पष्ट होते. अनेक कर्मचार्‍यांकडे प्रमाणपत्रे नव्हती.

संपादकीय भूमिका

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा उपाहारगृहांवर कायमचीच बंदी आणायला हवी आणि संबंधित मालकांचा परवानाही जप्त करायला हवा !